खऱ्या लग्नाच्या संकटातून सुटण्यासाठी तारिणी-केदारची नवी चाल; प्रोमोने वाढवली उत्सुकता

मनोरंजन

मुंबई: टीव्हीवर दिसणाऱ्या काही जोड्या प्रेक्षकांच्या विशेष लाडक्या ठरतात. सिद्धू-भावना, स्वानंदी-समर, सावली-सारंग, मीरा-अथर्व यांसारख्याच तारिणी मालिकेतील तारिणी आणि केदार ही जोडी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

मालिकेत तारिणी ही स्पेशल क्राइम युनिटची प्रमुख असून समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना अद्दल घडवण्याचे काम ही टीम करते. विशेष म्हणजे हे युनिट पडद्यामागे राहून काम करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. याच टीममध्ये केदारही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सध्या एका प्रकरणाच्या तपासासाठी तारिणी आणि केदार खांडेकर कुटुंबात पती-पत्नी म्हणून राहत आहेत. सुरुवातीला त्यांनी लग्न केल्याचे सांगितल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनी लग्न केलेले नसून ते केवळ तपासाचा भाग आहे. आता खांडेकर कुटुंब त्यांच्या लग्नाचा खरा सोहळा लावून देणार असल्याचे समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

प्रोमोमध्ये कौशिकी तारिणीला त्यांच्या पुन्हा लग्नाचा विचार सांगते. त्यावर तारिणी स्पष्ट शब्दांत नकार देत, “मी या लग्नाला तयार नाही; सारखी सारखी तीच चूक केली तर ती घोडचूक होते,” असे म्हणते. यानंतर केदार भावनिक होत, “तुझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो गं?” असा सवाल करतो. पुढे दोघांमध्ये जोरदार वाद होताना दिसतो. मात्र हे भांडण खऱ्या लग्नापासून सुटण्यासाठी केलेले नाटक असल्याचे संकेत प्रोमोमध्ये मिळतात.

वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना “खऱ्या लग्नाच्या संकटातून स्वत:ला सोडविण्यासाठी तारिणी-केदारची नवी चाल” अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे पुढील भागात नेमके काय घडणार, तारिणी-केदारची योजना यशस्वी होणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.