मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात घरातील वातावरण अक्षरशः तापले आहे. या आठवड्यात एकूण नऊ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले असून सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार यांच्यावर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे.
घराची सूत्रे राखीकडे; सदस्यांवर दबाव
या सगळ्यात ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस’ने घराची संपूर्ण जबाबदारी राखीकडे सोपवल्यानंतर तिने सदस्यांना स्वतःच्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली आहे.राखीने प्राजक्ता शुक्रेला घर साफ करण्यास सांगितले. मात्र, “मी एकटी हे काम करणार नाही,” असे स्पष्ट सांगत प्राजक्ताने नकार दिला. यामुळे संतापलेल्या राखीने किचनमधून पीठ आणून सोफ्यावर बसलेल्या प्राजक्ताच्या तोंडावर फेकले.
पिठफेक प्रकरणानंतर घरात संताप
या प्रकारामुळे घरातील वातावरण आणखी चिघळले. सचिन कुमावत आणि सागर कारंडे यांनी या वर्तनावर तीव्र आक्षेप घेत राखीला जाब विचारला. मात्र, राखीने कोणाचाही सल्ला ऐकण्यास नकार देत “तुम्ही सगळे माझ्या पायाखाली आहात,” असे ठणकावून सांगितले.वाद टोकाला गेल्यानंतर सचिन कुमावतने राखीच्या तोंडावर पाणी फेकले. यानंतर राखीचा संयम सुटला आणि रागाच्या भरात तिने डायनिंग टेबलजवळील खुर्ची खाली पाडली.
‘बिग बॉस’ची प्रॉपर्टी पुन्हा नुकसानग्रस्त
राखीने पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीचे नुकसान केले आहे. याआधीही भांडी फोडल्यामुळे तिला कॅप्टनपदाच्या शर्यतीतून बाद करण्यात आले होते. आता या नव्या प्रकारानंतर ‘बिग बॉस’ तिच्यावर कोणती कारवाई करणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.घरातील तणाव, वाढता संघर्ष आणि नॉमिनेशनची टांगती तलवार—या सगळ्यामुळे सहावा आठवडा अधिकच रंगतदार ठरणार, यात शंका नाही.