सांगली: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत मात्र एकमत झालेलं नाही. सहा सदस्य आणि सहा नेते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंतर्गत चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरू आहे.
राष्ट्रवादीत अंतर्गत खलबते
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांच्यासोबत महायुतीबाबत चर्चा सुरू केल्याने राष्ट्रवादीतील इतर नेते अस्वस्थ झाले. अजितराव घोरपडे, विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशणुख आणि शिवाजीराव नाईक यांनी स्वतंत्र बैठक घेत संजय पाटील यांना सुरुवातीला बोलावले नाही. स्थानिक राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन राज्य पातळीवर अहवाल पाठवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे.
मात्र, उशिरा रात्री संजय पाटील यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले. फूट पडण्यापेक्षा एकमत साधावे, असा सूर बैठकीत उमटला. अखेरीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून जे आदेश येतील, त्यानुसार अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. तरीही बैठकीत महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करण्याचा कल अधिक असल्याचे संकेत मिळाले.
जयंत पाटील यांचीही मध्यस्थी
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नेते व आमदार जयंत पाटील यांनी शिवाजीराव नाईक यांच्याशी संपर्क साधत महाविकास आघाडीची भूमिका कायम ठेवावी, असे आवाहन केल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांनी निवडणूकपूर्व आघाडी केल्यामुळे सत्तास्थापनेवेळी वेगळी भूमिका घेऊ नये, असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते. नाईक यांच्या स्नुषा जिल्हा परिषद सदस्या झाल्याने त्यांच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
फडणवीसांची मध्यस्थी?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी “देवाभाऊ हे मॅग्नेट आहेत, त्यांच्याकडे विषय गेला की तो संपतो,” असे म्हणत हा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. जिल्ह्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष घालावे लागेल का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
याशिवाय, शिंदे गटाच्या शिवसेनेतील आमदार सुहास बाबर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय हालचालींवर नाराजी व्यक्त केल्याने महायुतीतील अंतर्गत समन्वयाचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
एकूणच, सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढताना दिसत असून, अंतिम निर्णयासाठी सर्वांचे लक्ष सुनेत्रा पवार आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडे लागले आहे.