नागपूर: महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मण समाजाला फारसे महत्त्व नाही, अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. उत्तर भारतात ब्राह्मण समाजाचे फार चालते, असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाह्मण समाजाचे नेते आहेत. तरी, गडकरी यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नागपूर येथे अल इब्राहिम शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, “शिक्षण ही आपली शक्ती आहे. शिक्षण घेतल्याशिवाय कोणत्याही समाजाचा विकास होऊ शकत नाही. अनेक लोक ट्रक ड्रायव्हर, चहाचे दुकान अशी छोटीमोठी कामे करताना दिसतात. त्यांच्यात चांगले कला कौशल्य असूनही ते केवळ शिक्षणाअभावी मागे पडलेत. त्यामुळे सर्वांनी चांगल्या पद्धतीने सर्व भाषांचे शिक्षण घ्यावे.”
नितीन गडकरी म्हणाले, “मी ब्राह्मण आहे. मात्र, इथे (महाराष्ट्रात) ब्राह्मणांचे फार चालत नाही. त्यांना इथे फारशे महत्त्वही नाही. पण, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये त्यांना खूप महत्त्व आहे. तिकडे दुबे, मिश्रा, पांडे, चतुर्वेदी आदींची खूप चलती असते. त्यांचा तिथे फार मोठा दबदबा आहे. मी एकदा उत्तर प्रदेशातील एका कार्यक्रमाला गेलो. तिथे सर्वजण माझ्याकडे आले. म्हणाले, ‘पंडित अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आपल्या समाजाचा कुणी दमदार नेता असेल तर ते तुम्ही आहात.’ मी म्हणालो, ‘मीच का?’ त्यांनी म्हटलं, ‘कारण तुम्ही ब्राह्मण आहे.’ मग मी म्हणालो, ‘मी जात-पात मानत नाही. तुम्ही मला हे का सांगत आहात?”
“खरी गोष्ट ही आहे की, लोक तुम्हाला तुमच्या कामाने, कार्याने, गुणवत्तेने, गुणाने कौशल्याने पसंत करतात. मी आता डॉक्टर नाव लावत नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे ७ विश्वविक्रम झालेत. माझा अनुभव असा आहे की, तुम्ही शिक्षणात कितीही चांगले गुण घेतले तरी तुम्ही यशस्वी व्हाल याची कोणतीही खात्री नाही. मी लॉ कॉलेजमध्ये शिकत होतो. तेव्हा जे विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि मेरिटमध्ये येत होते, त्यांची वकिली आज फार चालत नाही. मात्र, आमच्यासारखे जे विद्यार्थी बदमाशी करत होते, ते आज खूप मोठे वकील झालेत. ते कोटीत कमाई करत आहेत,” असेही गडकरी यांनी सांगितलं.