चुकीची ट्रेन, १४ वर्षांच्या विरहानंतर राजाचा अखेर कुटुंबाशी संपर्क

महाराष्ट्र

झारखंड: झारखंडमधील चाईबासा येथील राजा गोप हा अवघ्या सहा वर्षांचा असताना झालेल्या एका चुकीमुळे तब्बल १४ वर्षे कुटुंबापासून दूर राहिला. २०१२ साली वडिलांसोबत वीट भट्टीवर कामासाठी हावडा येथे जाण्यासाठी निघालेल्या राजाने घाईगडबडीत चुकीची ट्रेन पकडली आणि त्याचं आयुष्यच बदललं. ती ट्रेन थेट केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचली.

अनोळखी राज्यात लहानग्याची धडपड

अनोळखी भाषा, अनोळखी माणसं आणि कुठे जायचं याची काहीच कल्पना नसताना लहानग्या राजाला स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आधार दिला. त्याला आई-वडील आणि भावंडांची नावं आठवत होती; मात्र आपलं गाव नेमकं कुठे आहे, जिल्हा कोणता आहे याची माहिती देता येत नव्हती. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा शोध घेणं सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठं आव्हान ठरलं.राजाला नंतर केरळमधील कन्नूर येथे बाल कल्याण समितीच्या कौशल्य विकास व पुनर्वसन कार्यक्रमात दाखल करण्यात आलं. याच दरम्यान त्याची ओळख फरदीन खान यांच्याशी झाली.

‘रेल्वे चिल्ड्रन’च्या पुढाकाराने शोध मोहिम

फरदीन खान हे रेल्वे चिल्ड्रेन या स्वयंसेवी संस्थेसोबत कार्यरत असून झारखंड राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यांनी राजाकडून पुन्हा माहिती घेतली असता “चाईबासा” हे नाव समोर आलं. त्यानंतर खान यांनी राजाचा व्हिडिओ तयार करून तो संबंधित भागात पोहोचवण्याची व्यवस्था केली.काही दिवसांतच हा व्हिडिओ सिंहभूम जिल्ह्यातील हरिमारा गावात राहणाऱ्या राजाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. १४ वर्षांनंतर आपल्या मुलाचा ठावठिकाणा लागल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

वडिलांचं निधन; आईची भावूक प्रतिक्रिया

दरम्यानच्या काळात परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली होती. राजाच्या वडिलांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं आहे. सध्या त्याची आई, भाऊ आणि बहीण मजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत.राजाची आई भावूक होत म्हणाली, “माझा लेक जिवंत आहे, सुखरूप आहे हे कळल्यावर खूप आनंद झाला. आज त्याचे बाबा असते तर त्यांनी त्याला पाहिलं असतं. त्यांनाही खूप आनंद झाला असता.”

प्रशासनाच्या पुढाकाराने लवकरच भेट

झारखंडच्या महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी केरळच्या संबंधित विभागाच्या संपर्कात आहेत. आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरच राजा आणि त्याच्या कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घडवून आणली जाणार आहे.

चुकीची ट्रेन पकडण्याच्या एका क्षणिक निर्णयामुळे १४ वर्षांचा विरह सहन करावा लागलेल्या राजाची ही कहाणी सामाजिक संस्थांच्या आणि प्रशासनाच्या समन्वयातून आशेचा किरण दाखवणारी ठरली आहे. आता सर्वांच्या नजरा राजा आणि त्याच्या कुटुंबाच्या भावनिक पुनर्भेटीकडे लागल्या आहेत.