खरात प्रकरणावर सरकार झोपेत? सपकाळांचा घणाघात

महाराष्ट्र

साताऱ्यातील प्रकारावरून लोकशाहीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका केली आहे. दिवाळीपासूनच खरातच्या गैरव्यवहारांची माहिती सरकारकडे होती, मग सहा महिने कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीला अधिक बळ द्यावे, टास्क फोर्स स्थापन करावी आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी. सरकार जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सपकाळ यांनी या प्रकरणाला अंधश्रद्धेचे दुष्परिणाम मानत समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची गरज व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याचा उल्लेख करत अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला असला तरी इतर संबंधितांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील गोंधळावर बोलताना त्यांनी मंत्री शंभुराजे देसाई आणि मकरंद पाटील यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या प्रकारावरून सरकारवर निशाणा साधला. “राज्यात मंत्रीच मार खात असतील तर लोकशाही धोक्यात आहे,” अशी टीका त्यांनी केली. या घटनेतून ‘वोट चोरी’वर शिक्कामोर्तब झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

याशिवाय, आमदार संजय गायकवाड यांच्यावरही सपकाळ यांनी गंभीर आरोप करत विकासकामांची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली. कंत्राटे, अवैध व्यवसाय आणि संपत्ती वाढ याबाबत पारदर्शकता ठेवावी, असे ते म्हणाले.एकूणच, भोंदूबाबा प्रकरणामुळे अंधश्रद्धा, प्रशासनाची भूमिका आणि राजकीय जबाबदारी या मुद्द्यांवर राज्यात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.