Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती टाकण्याच्या वादातुन दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातुन एका तरुणाने बाहेरचे गुंड आणुन दहशत करत दुसऱ्या तरुणाच्या जेसीबी मशिनच्या काचा फोडल्या. बाहेरुन आलेल्या गुंडाच्या हातात कोयता तसेच सत्तूर सारखी घातक शस्र होती. तसेच हे सर्व गुंड नशेत होते अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.

या घटनेमुळे शिंदोडी गावात नागरिक भयभीत झाले असुन गावातील स्थानिक तरुणांच्या झालेल्या किरकोळ वादातुन बाहेरचे गुंड आणुन गावात दहशत पसरवत जर जेसीबीच्या काचा फोडण्यापर्यंत एखाद्याची मजल जात असेल तर कायद्याचा नक्की ‘धाक’ राहिला आहे का…? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शिंदोडी गावात पहिल्यांदाच अशी घटना घडल्यामुळे वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

नक्की काय आहे प्रकरण…?

शिंदोडी येथील घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या एका शेतकऱ्याच्या जमिनीचे सपाटीकरणाचे काम काही दिवसांपुर्वी गावातील एका तरुणाने घेतले होते. त्यानंतर त्याच जमिनीत काळी माती टाकण्याचे काम गावातीलच दुसऱ्या तरुणाने घेतले. त्यानंतर या कामावरुन दोन्ही तरुणांमध्ये सुप्त संघर्ष चालू झाला. त्यानंतर काळी माती टाकण्याचे काम मिळालेल्या तरुणाच्या एका मित्रासोबत जमिनीचे सपाटीकरणाचे काम मिळालेल्या तरुणाचा किरकोळ वाद झाला.

किरकोळ वाद अन जेसीबीची तोडफोड…

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरवार (दि 16) रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास जमिनीचे सपाटीकरणाचे काम ज्या तरुणाला मिळाले होते. त्याने बाहेरच्या गावातील गुंड आणुन शिवीगाळ अन दमदाटी करत शस्त्रांचा धाक दाखवत काळी माती टाकण्याचे काम मिळालेल्या तरुणाच्या जेसीबीच्या काचा फोडल्या. तसेच माती वाहणाऱ्या ट्रॅक्टरवर आणि जमीन मालकाच्या दुचाकीवर सुद्धा दगडफेक केली. विशेष म्हणजे बाहेरुन आलेले गुंड हे नशेत होते अशी प्रत्यक्षदर्शीनी नाव न छापण्याच्या अटीवर माहिती दिली.

तरुण दहशतीखाली असल्यामुळे तक्रार देण्यास टाळाटाळ…

बाहेरच्या गुंडाना शिंदोडी गावात आणणाऱ्या तरुणाविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात काही दिवसांपुर्वी मातीचोरी करताना एका शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घातल्याबद्दल गुन्हा दाखल आहे. हा तरुण निर्वी, न्हावरे, शिरसगाव काटा या भागात रात्रीच्या वेळेस माती चोरीचा उद्योग करत असल्याचीही दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा असुन काही दिवसांपुर्वी मातीचोरी करताना तो ‘रंगेहाथ’ सापडला होता. परंतु त्यावेळी महसूल आणि पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना ‘चिरीमिरी’ दिल्याने त्याच्यावर कारवाई झाली नसल्याचीही सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळेच शिंदोडी येथील स्थानिक तरुण दहशतीखाली असुन शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला तो टाळाटाळ करत असल्याची खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत