शिवसेनेचा राज्यव्यापी संवाद दौरा; डॉ. श्रीकांत शिंदे २२ जिल्हे, १०० हून अधिक मतदारसंघ पिंजून काढणार

महाराष्ट्र

मुंबई: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा Dr. Shrikant Shinde यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. तब्बल दोन महिने चालणाऱ्या या दौऱ्यात राज्यातील २२ जिल्हे आणि १०० हून अधिक विधानसभा मतदारसंघांचा समावेश असणार आहे.

शिवसेना सचिव Bhausaheb Chaudhari यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याची माहिती दिली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या आदेशानुसार ३० मार्च २०२६ रोजी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाणे लोकसभा क्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

यापूर्वी २०२४ विधानसभा निवडणुकीपूर्वीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राज्यातील ६५ ते ७० विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. मोठ्या सभांपेक्षा प्रत्यक्ष भेटींना प्राधान्य देत त्यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्न, सूचना आणि निवडणूक रणनीतीवर भर दिला होता.

आता नव्या राज्यव्यापी दौऱ्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी, बूथस्तरावरील पक्षबांधणी, संघटनात्मक रणनीती आणि शिवसेनेच्या विविध आघाड्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. एसआयआर मोहिमेअंतर्गत बीएलए आणि बूथ प्रमुखांच्या नियुक्त्यांवरही चर्चा होणार आहे.

या बैठकींमध्ये जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि बूथस्तरावरील शिवसैनिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे. स्थानिक प्रश्न, संघटनात्मक अडचणी, निवडणुकीतील आव्हाने आणि पुढील नियोजनावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

दौऱ्याचे टप्पे असे :

पहिला टप्पा (मे २०२६) : नाशिक, धुळे, अहिल्यानगर, बीड, अमरावती आणि अकोला

दुसरा टप्पा (जून २०२६) : जळगाव, नंदुरबार, यवतमाळ, वाशिम, नांदेड, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली

तिसरा टप्पा (जुलै २०२६) : बुलढाणा, जालना, नागपूर, भंडारा, गोंदिया, ठाणे आणि पालघर

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील शिवसैनिकांना नव्या उमेदीने सक्रिय करणे, हा या राज्यव्यापी दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत