कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

महाराष्ट्र

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असतानाच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगितले. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

“मी स्वतः घटनास्थळी उपस्थित असताना ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, अजूनही दोन जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती आहे,” असे अहिर यांनी सांगितले.

बचावकार्यात अनेक अडचणी येत असतानाही अग्निशमन दलाचे जवान आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगत अहिर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत

दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना तातडीचा दिलासा देण्यासाठी प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री मदत निधीतूनही पीडित कुटुंबांना अतिरिक्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे अहिर यांनी स्पष्ट केले.

कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी

“मुंबईत सुरक्षित घर हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे,” असे सांगत सचिन अहिर यांनी या परिसरातील रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची गरज व्यक्त केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या भागातील प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला’ पुन्हा वेग देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली जाणार असल्याचेही अहिर यांनी सांगितले.

भविष्यात भूस्खलनासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे, तसेच धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करणे ही काळाची गरज असल्याचे सचिन अहिर यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत