मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
मेघूदत या शासकीय निवासस्थानी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्न व लक्षवेधी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच म्हाडा पुनर्विकासातील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आमदारांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे नमूद करण्यात आले. तसेच लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता आणि समन्वयात्मक भूमिका प्रशंसनीय असल्याची भावना आमदारांनी व्यक्त केली.