रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रमुख काजू उत्पादक पट्टा असलेल्या कोकणातून ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’चे मुख्यालय चंदगड येथे स्थापन करण्याच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे. कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
राज्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड असून, त्यातील मोठा हिस्सा कोकणात आहे. तसेच काजू प्रक्रिया करणारे सुमारे ४०० उद्योग कोकण विभागात कार्यरत आहेत. देशातील मोठ्या प्रमाणातील काजू प्रक्रिया कोकणातून होत असताना बोर्डाचे मुख्यालय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे नेण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या निर्णयाची घोषणा हलकर्णी येथे झाल्यानेही टीका होत आहे. “जिथे उत्पादन होते तिथे निर्णय न घेता, राजकीय प्रभाव असलेल्या भागात निर्णय घेतले जात आहेत,” असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काहींनी याला “हलकर्णी पॅटर्न” असे संबोधत प्रादेशिक असंतोषाला हवा दिली आहे.
कोकणातील काजू उत्पादकांचे म्हणणे आहे की, बोर्ड कोकणात स्थापन झाले असते तर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. तसेच शेतकरी आणि उद्योगांना प्रशासकीय कामांसाठी कोल्हापूरपर्यंत हेलपाटे मारावे लागणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सरकारकडून या निर्णयामागील नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, कोकणातील विविध संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींनी बोर्डाचे मुख्यालय कोकणातच स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.