पुण्यातील विषारी दारु मृत्यू प्रकरणाचे धागेदोरे शिरुरपर्यंत…?

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारुमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर आता या संपुर्ण प्रकरणाचे धागेदोरे शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकी हद्दीपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काही दिवसांपुर्वी टाकळी हाजी परिसरात ग्रामस्थांनी संशयास्पद दारुची वाहतुक करणारी एक गाडी पकडली होती. या गाडीतून मोठ्या प्रमाणात विषारी दारुची वाहतूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. विशेष म्हणजे, हा माल पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पुरवठा केला जात असल्याचेही त्या वेळी निदर्शनास आले होते.

त्यावेळेस ग्रामस्थांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली. मात्र, या संपूर्ण रॅकेटमध्ये स्थानिक पोलिसांचा एक हस्तकच विषारी दारुची भट्टी चालवत असल्याचे आणि वाहतुकीत सहभागी असल्याचे समोर आल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित वाहनावर आणि आरोपींवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

याप्रकरणी ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे तसेच पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी आणि पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे. मात्र तरीदेखील संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी तब्बल 40 हजार लिटर विषारी रसायनयुक्त दारुची भट्टी उध्वस्त करण्यात आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणातील साठा आणि त्याआधी पकडलेली विषारी दारुची गाडी यावर जर वेळेत आणि कठोर कारवाई झाली असती, तर पुणे शहरात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही विषारी दारु नेमकी कुठे पुरवली जात होती, याचे मोठे धागेदोरे हाती लागले असते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

‘स्थानिक पोलिसांनी सुरुवातीपासुनच या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले. काही अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परिणामी आज निष्पाप लोकांचे जीव जात आहेत’ असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला. या संपुर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित आरोपींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडुन होत आहे. विषारी दारु प्रकरणामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात पोलिस प्रशासन नेमकी कोणती भुमिका घेणार, याकडे शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत