आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा उपचार करीत असताना आपण श्वास रोखून धरतो. श्वासाचा वापर करून मानसिक अस्थिरता कमी करण्या सोबतच वेदनेची तीव्रता कमी करता येते.
श्वास ही नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ती चालू राहण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही, असे आपल्याला वाटते; पण याच विचारातून आपण आपल्या श्वासाकडे दुर्लक्ष करतो व त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण सुरू असलेल्या श्वसनावर लक्ष केंद्रित केले असता, ते खूपच उथळ व वेगाने होत आहे हे आपल्या लक्षात येईल. उथळ श्वसनाचे अनेक तोटे आहेत. उथळ श्वसन आपल्या शरीरा बरोबरच आपल्या मनःस्वास्थ्यावरही परिणाम करते. या समस्या टाळायच्या असतील तर दीर्घ श्वास घेणे गरजेचे आहे.
आपण फुफ्फुसांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर करीतच नाही. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही व परिणामी तब्येतीवरही त्याचा परिणाम होतो. आपण किती हळू व वेगाने श्वास घेतो यावर आपले आयुर्मान अवलंबून असते. कबुतर हे सर्वात वेगाने श्वास घेते त्यामुळे त्याचे आयुर्मान कमी असते, तर कासव हा सर्वात दीर्घ व सावकाश श्वसन करणारा प्राणी असल्यामुळे तो दीर्घायुषी असतो. आपले उत्तम आरोग्य, संतुलित मनःस्थिती व दीर्घायुष्य यासाठी दीर्घ श्वसन करणे खूप महत्त्वाचे आहे. याशिवायही दीर्घ श्वसनाचे अनेक फायदे आहेत.
दीर्घ श्वसन केल्यास मनःस्थिती प्रसन्न होते व शरीरास त्याचा फायदा होतो. इतर शिस्तीच्या सवयी प्रमाणेच दीर्घ श्वसन करण्याचीही शरीराला सवय लावावी. यासाठी रोज थोडा सराव करणे फायदेशीर ठरते. सर्वप्रथम ताठ बसावे. यानंतर नाकाने हळूहळू प्रथम पोटात हवा भरून, नंतर छातीत हवा भरावी. या सगळ्या दरम्यान हळूहळू १ ते ५ आकडे मोजावेत. श्वास संपूर्ण आत भरल्या नंतर थोडा वेळ रोखून धरावा व १ ते ३ आकडे मोजावेत. यानंतर श्वास बाहेर सोडावा व यादरम्यान पुन्हा १ ते ५ असे आकडे मोजावेत. या सगळ्या दरम्यान श्वास हळूहळू आत बाहेर करीत आहे याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीला आपले मन आपल्या श्वासावरून हटेल; पण सरावाने ते जमायला लागेल. दीर्घ श्वसनाचा फायदा मिळवण्यासाठी श्वसनाच्या सरावासाठी दिवसातील १० मिनिटांचा वेळ काढून दिवसातून दोन वेळा सराव करावा.
उथळ श्वसनाचे तोटे
श्वसन उथळ असेल; तर त्याचा शरीराला तोटा होतो. उथळ श्वसनामुळे फुफ्फुसांच्या क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे आरोग्य बिघडते व श्वसनाचे अनेक रोग होण्याचा धोका निर्माण होतो. याशिवाय उथळ श्वसनामुळे शरीराची ऑक्सिजनची गरज पूर्ण होत नाही, शरीरांतर्गत विकास व आरोग्य यांना अडथळा निर्माण होतो. शरीरातील रक्त निरोगी राहण्यासाठी व शरीरातील प्रत्येक भागापर्यंत व्यवस्थित रक्तपुरवठा होण्यासाठी दीर्घ श्वसनाद्वारे शरीरात ऑक्सिजन जाणे महत्त्वाचे असते. त्याच प्रमाणे श्वसनाचा मनःस्थितीशी खूप जवळचा संबंध असतो. सतत अस्वस्थता असणे, एकाग्रतेचा अभाव, गोंधळ उडणे इत्यादी मानसिक समस्यांवर दीर्घ श्वसन हा योग्य उपाय आहे. अस्वस्थ झाल्यावर आपण श्वसनाचा वेग वाढतो. उलट विचार केल्यास वेगाने श्वसन केल्यास अस्वस्थता निर्माण होते.
दीर्घ श्वसनाचे फायदे
शरीरातील ७०% विषारी घटक हे श्वसनाद्वारे बाहेर टाकले जातात. दीर्घ श्वसन केल्याने शरीरातील विषारी घटक मोठ्या प्रमाणात बाहेर टाकले जातात. यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे काम वाचते व आरोग्य उत्तम राहते.
दीर्घ श्वसनामुळे मेंदूवरील ताण कमी होतो. अस्वस्थ असल्यावर श्वास वाढतो व याउलट शांत असल्यावर हा वेग थोडा कमी होतो. त्यामुळे थकवा आल्यास किंवा ताण आल्यास ताठ बसावे व दीर्घ श्वसन करावे. यामुळे ताण काही वेळातच कमी होईल.
दीर्घ श्वसनामुळे शरीर आरामदायक स्थितीत येते. त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो व स्नायू सैलावतात.
रक्तातील हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो व त्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढून शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो व त्याचा विकास होतो. पचनक्रिया सुधारण्यासाठी दीर्घ श्वसनाचा खूप फायदा होतो.
शरीरातील प्रत्येक पेशी कार्यक्षम होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
दीर्घ श्वसनामुळे फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो, त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.
दीर्घ श्वसनामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही व आरोग्य उत्तम राहते.
दीर्घ श्वसनामुळे मणका, मेंदू व मज्जारज्जू इत्यादी मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊन त्यांची कार्यक्षमता सुधारते.
दीर्घ श्वसनामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने रक्त शुध्द होते.
(सोशल मीडियावरून साभार)