उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

महाराष्ट्र

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उदित राज, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सपकाळ यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे काँग्रेस परिवारात स्वागत केले.

उत्तर भारतीय समाजाचे महाराष्ट्राच्या प्रगतीत मोठे योगदान असून हा समाज काँग्रेससोबत नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. काँग्रेसनेही उत्तर भारतीय समाजातील कार्यकर्त्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात विविध पदांवर काम करण्याची संधी दिली आहे. राहुल गांधी यांच्या रूपाने काँग्रेसला कणखर नेतृत्व मिळाले असून त्यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे. काँग्रेस संघटना मजबूत करून देशात आणि राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

वंदे मातरम्’वरून भाजपकडून राजकारण : सपकाळ

‘वंदे मातरम्’वरून भारतीय जनता पक्षाकडून राजकारण केले जात असून काँग्रेसविरोधात अपप्रचार केला जात आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ‘वंदे मातरम्’ हे १८९६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात प्रथम गायले गेले होते. त्यानंतर २४ जानेवारी १९५० रोजी त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन होत आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जास्त वेळ उभे राहता येत नसल्याने सोनिया गांधी त्यांना काही सूचना करत असताना त्याचा चुकीचा अर्थ काढून भाजपकडून अपप्रचार केला जात आहे. ‘वंदे मातरम्’बाबत भाजपने काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

समाजात विष पेरणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ’

राजेंद्र पाल गौतम यांनी काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख करत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांनी बलिदान दिले, तुरुंगवास भोगला आणि आंदोलन केले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या सरकारांनी देशाच्या विकासाची पायाभरणी केली; मात्र सध्याचे सरकार त्या सार्वजनिक मालमत्तेची विक्री करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

जात आणि धर्माच्या नावावर समाजात विष पेरले जात आहे. अशा प्रकारे समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली आहे, असे गौतम म्हणाले.

उदित राज यांनीही उत्तर भारतीय समाजाला काँग्रेससोबत जोडण्याचे आवाहन केले. काँग्रेसने उत्तर भारतीय समाजातील अनेकांना मंत्री, आमदार आणि खासदार म्हणून नेतृत्वाची संधी दिली आहे. काँग्रेसला उत्तर भारतीय समाजाची आणि समाजाला काँग्रेसची गरज आहे. देशातील धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेस महत्त्वाची भूमिका बजावत असून सरकारला जाब विचारणारे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या सत्तेचे काऊंटडाऊन सुरू झाले असून लवकरच देशात काँग्रेसचे सरकार येईल, असा विश्वासही उदित राज यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत