तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन; कवठे यमाईत प्रवेश करताच सराईत आरोपी जेरबंद

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर: पुणे जिल्हा तसेच अहमदनगर जिल्ह्यातील दोन तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून मूळ गावी प्रवेश केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव योगेश तुकाराम देवकर (वय ३०, रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय दंडाधिकारी (पुणे उपविभाग) यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार योगेश देवकर याला संपूर्ण पुणे जिल्हा (पुणे शहर व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीसह) तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

मात्र, संबंधित आदेश लागू असतानाच कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता आरोपी शनिवारी (४ जुलै) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास कवठे यमाई गावात आल्याची माहिती शिरूर पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग आणि त्यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

शिरूर पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान आरोपीने तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तडीपार आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी शिरूर पोलीस विशेष मोहीम राबवत असून, विनापरवानगी हद्दीत प्रवेश करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद खटींग करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत