सावरकरांचा अपमान गोलवलकरांच्या पुस्तकातही; मग ‘बंच ऑफ थॉट्स’ फाडणार का? शिंदेसेनेला सचिन सावंतांचा सवाल!

महाराष्ट्र

संघाच्या विचारसरणीवरून शिंदेसेनेला घेरले; ‘सावरकरांचा खरा अपमान उजव्या विचारांच्या लोकांकडूनच’

मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या Belonging: A Journey of Love या पुस्तकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या उल्लेखावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या पुस्तकात सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी पुस्तक फाडून निषेध नोंदवला. तसेच पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. मात्र, सावरकरांचा अपमान झाल्याची एवढीच खंत असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाचे काय करणार? ते पुस्तक फाडणार का आणि संघ विचारसरणीच्या सरकारमधून बाहेर पडणार का, असा थेट सवाल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा तेलंगणाचे सहप्रभारी सचिन सावंत यांनी केला आहे.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत यांनी शिंदेसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे राजकारण खोक्यापासून सुरू होऊन खोक्यापर्यंतच संपते. संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचाराला उत्तर विचाराने द्यायचे असते, याचे भानही त्यांच्या प्रवक्त्यांना नाही. सोनिया गांधी यांचे पुस्तक फाडणारे पाच प्रवक्ते वेगवेगळ्या पक्षांतून शिंदेसेनेत आलेले असून, त्यांना स्वतःची स्वतंत्र वैचारिक भूमिका नाही.

सोनिया गांधी यांनी पुस्तकाच्या पान क्रमांक २०१ वर सावरकरांचा केवळ ओझरता उल्लेख केला आहे. त्यात त्यांनी मांडलेली माहिती ऐतिहासिक सत्यावर आधारित आहे. सोनिया गांधी यांची राजकीय कारकीर्द गांधीजींच्या सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांशी निगडित राहिली आहे. शिंदेसेनेच्या प्रवक्त्यांनी अभ्यास केला असता, तर असा प्रकार घडला नसता, अशी टीकाही सावंत यांनी केली.

‘बंच ऑफ थॉट्स’ आणि अरुण शौरींच्या पुस्तकाचे काय?

सावरकरांविषयीच्या उल्लेखावरून सोनिया गांधी यांच्या पुस्तकाला विरोध करणाऱ्या शिंदेसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकातील सावरकरांविषयीच्या कथित नकारात्मक उल्लेखावरही भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान सावंत यांनी दिले. भाजपचे नेते अरुण शौरी यांनी लिहिलेल्या The New Icon: Savarkar and the Facts या पुस्तकातही सावरकरांबाबत ऐतिहासिक संदर्भ मांडण्यात आले आहेत. मग शिंदेसेना हे पुस्तकही फाडणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पुणे न्यायालयात राहुल गांधी विरुद्ध सात्यकी सावरकर यांच्यातील सावरकर बदनामी प्रकरणाच्या सुनावणीत सावरकरांनी दहा वेळा माफीनामे दिल्याचे सात्यकी सावरकर यांनी मान्य केल्याचा दावाही सावंत यांनी केला. या साक्षीदरम्यान वीर ही उपाधी, माफीनामे, पेन्शन, मुस्लिम लीगसोबत सरकार स्थापन करणे तसेच गांधी हत्येशी संबंधित संदर्भांवरही भाष्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

सावरकरांचा अपमान उजव्या विचारधारेकडूनच’ 

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील उल्लेखापेक्षा सावरकरांचा अधिक अपमान गोळवलकर यांच्या पुस्तकात झाल्याचा दावा करत सावंत म्हणाले की, अरुण शौरी यांच्या पुस्तकातही सावरकरांविषयी वेगळी भूमिका मांडण्यात आली आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांचा पक्ष त्याच विचारसरणीच्या पक्षासोबत सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सावरकरांचा अपमान झाल्याचा कांगावा करण्यापेक्षा शिंदेसेनेने आधी स्वतःची वैचारिक भूमिका स्पष्ट करावी.

सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे किंवा त्यांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे, यातून सावरकरांचा सन्मान होत नाही. उलट त्यांच्या नावाने राजकारण करणारेच त्यांची अवहेलना करत आहेत. सावरकरांची खरी अवहेलना उजव्या विचारधारेतील लोकांकडूनच सुरू आहे, असा घणाघात सचिन सावंत यांनी केला.

दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरून सुरू झालेल्या या वादात आता शिंदेसेनेने संघाच्या विचारसरणीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे नवे राजकीय आव्हान काँग्रेसने दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत