शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): व्यापाऱ्यांना सुरक्षित, भयमुक्त आणि कायद्याचे संरक्षण असलेले वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने बुधवारी (दि. ८) व्यापारी असोसिएशन व विविध व्यावसायिकांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
बैठकीत बेकायदेशीर पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमणे, रस्त्यात उभ्या राहणाऱ्या रिक्षा व इतर वाहने, भाजी विक्रेते, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, मोठ्या आवाजाचे सायलेंसर, अनधिकृत गतिरोधक, कंपन्यांच्या बसथांब्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, विनापरवाना फ्लेक्स, अनधिकृत लाईट खांब, पानटपऱ्या आणि वाहतूक कोंडी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “कोणतीही व्यक्ती दादागिरी करत असेल, खंडणी किंवा पैशांची मागणी करत असेल, धमक्या देत असेल किंवा बेकायदेशीर दबाव टाकत असेल तर व्यापाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकरणांत संबंधितांविरुद्ध त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
परिसरातील चोऱ्या रोखण्यासाठी नियमित पोलीस गस्त वाढविणे, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे, अपघात टाळण्यासाठी नियोजन करणे आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेसाठी २४ तास मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. संशयास्पद हालचाली किंवा बेकायदेशीर प्रकार दिसताच विलंब न करता पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले.
बैठकीत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नवनाथ सासवडे, संभाजी मांढरे यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांनी वाहतूक, अतिक्रमण, पार्किंग आणि इतर स्थानिक समस्यांबाबत मते मांडली. पोलीस निरीक्षक यादव यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक व्यापाऱ्यांना देत समस्या थेट फोन किंवा संदेशाद्वारे कळविण्याचे आवाहन केले.
या बैठकीस गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, भाजपा नेते पंढाभाऊ गायकवाड, निलेश राऊत, शरद टेमगिरे, प्रकाश चव्हाण, अतुल पानमंत, अंकुश घारे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.
बैठकीतील सकारात्मक भूमिकेचे व्यापाऱ्यांनी स्वागत करत पोलीस प्रशासनाचे आभार मानले. व्यापारी व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी अशा बैठका नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.