‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत पारदर्शकता राखा; विभागनिहाय कार्यशाळा घ्या; मंत्री भरत गोगावले

महाराष्ट्र

मुंबई: ‘व्हीबी-जी राम जी’ (विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन) योजनेची अंमलबजावणी शासनापासून गावपातळीपर्यंत पूर्ण पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सतर्कतेने करण्यात यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. योजनेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा होणार नाही, याची दक्षता घेत प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोगावले यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेतला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आयुक्त अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देताना मंत्री गोगावले यांनी प्रशासकीय त्रुटींमुळे मजुरांची देणी थकू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष काळजी घ्यावी, असे स्पष्ट केले. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर निधी हस्तांतरण आणि व्यवस्थापनाची प्रक्रिया विहित कालावधीत व पूर्ण पारदर्शकतेने पूर्ण करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

योजनेतील सर्व कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे वेळेत सादर करावीत आणि प्रत्येक कामाचा नियमित आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

योजनेची माहिती तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी पुढील महिन्यापासून विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि गावपातळीवरील लोकप्रतिनिधी सहभागी होणार असून, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातही अशाच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिली.

दरम्यान, कोकण विभागाची भौगोलिक परिस्थिती आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन योजनेतील कामांच्या स्वरूपात आवश्यक बदल करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. स्थानिक परिस्थितीनुसार योजना अधिक परिणामकारक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मंत्री गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत