भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

वैजापूरच्या शेतकरी मेळाव्यात मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल; शेतकरी, महागाई, बेरोजगारी आणि स्मार्ट मीटरवरून टीका

मुंबई: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

सपकाळ म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतकरी संकटात सापडला असून शेतीचा खर्च वाढला, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या आणि बेरोजगारी वाढली आहे. महागाई, महिला अत्याचार आणि शेतकरी प्रश्नांवर केंद्र सरकार मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’ या धोरणानुसार मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्मार्ट मीटर, समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक तसेच राम मंदिर निधीच्या संदर्भातही सरकारवर गंभीर आरोप केले. देशाचा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक एम. एस. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकानुसार चालवला जात असल्याचाही दावा त्यांनी केला.

“देशात ‘पैसा फेक, तमाशा देख’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भ्रष्टाचार, महागाई आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणे हीच काँग्रेसची भूमिका आहे,” असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

या मेळाव्यास खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, माजी आमदार नामदेवराव पवार, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत