‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (E-KYC), आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रिस्टॅक (Agristack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की, नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीची रक्कम DBT द्वारे खात्यात जमा केली जाईल.
कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित बँक शाखा, ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी संस्थांमध्ये प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या मोबाईलवर Reference ID सहित SMS पाठवण्यात येईल. हा संदेश मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी E-KYC करून आधार पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
शेतकरी महा-ई-सेवा केंद्र, CSC किंवा संबंधित बँकेत बायोमेट्रिकद्वारे, तसेच अधिकृत कर्जमाफी पोर्टलवर OTP द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकतात. माहितीमध्ये त्रुटी आढळल्यास ऑनलाइन तक्रार नोंदवण्याचीही सुविधा उपलब्ध आहे.
शासनाने शेतकऱ्यांना आधार व बँक खात्याशी मोबाईल क्रमांक अद्ययावत ठेवण्याचे, DBT सुविधा सक्रिय असल्याची खात्री करण्याचे आणि Agristack नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आजी-माजी लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी (चतुर्थ श्रेणी वगळून), शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या व्यक्ती तसेच काही सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.