अमली पदार्थांना नकार, जीवनाला होकार’; राज्यव्यापी नशामुक्ती अभियानाचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

महाराष्ट्र

मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार (३० जुलै) रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानात युवक, विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नशामुक्त समाज घडविण्याची प्रतिज्ञा घ्यावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ या संदेशावर आधारित या अभियानांतर्गत वर्षभर राज्यभर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये, पालक, समुपदेशक आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून अमली पदार्थांविरोधात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमासोबतच विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातूनही सहभागी होणार असून, प्रतिबंध, समुपदेशन आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा प्रसार यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या विळख्यात युवक अडकू नयेत यासाठी शासनाने ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून नशामुक्त मुंबईचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सुरक्षित, सशक्त आणि व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत