विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त
शिरूर (अरुणकुमार मोटे): बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून, भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. एआयचे शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून भविष्यातील संधींसाठी स्वतःला तयार करावे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी केले.
सविंदणे (ता. शिरूर) येथील श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. २६) ‘अजितदादा एआय लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अॅड. कदम बोलत होते. कार्यक्रमाला एआय गुरुजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पवार, विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार नरवडे, गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या एआय लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि आभासी वास्तव (व्हर्च्युअल रिअॅलिटी) अशा आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने नियमित तासिका घेतल्या जाणार असून, विविध प्रकारची तंत्रज्ञानाधारित मॉडेल्स विद्यार्थ्यांकडून तयार करून घेतली जाणार आहेत. त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळणार आहे.
उच्च शिक्षणाचा पाया शालेय स्तरावरच!
या अभ्यासक्रमाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वीच एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभूत माहिती मिळणार आहे. विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्रात पुढील शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा फायदा होणार आहे. शालेय स्तरावरच तंत्रज्ञानाची ओळख, मॉडेल निर्मिती, प्रयोगशीलता आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित झाल्यास उच्च शिक्षणातील तांत्रिक विषय समजून घेणे अधिक सोपे होणार आहे.
एआय गुरुजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप पवार यांनीही विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या शिक्षणाची गरज स्पष्ट केली. या लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सर्जनशीलतेला चालना मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची आणि भविष्यातील संधींची तयारी करण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार नरवडे यांनी केले. सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने यांनी केले, तर विकास शिंदे यांनी आभार मानले.