अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणी यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या आढळून आल्या. हा प्रकार पाहून त्यांनी विक्रेत्याकडे जाब विचारला असता, संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचे विक्रेत्याने सांगितले.

या घटनेनंतर शहरात मुदतबाह्य, बुरशी लागलेले व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. नागरिकांच्या मते, अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी व प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

दूषित अन्नपदार्थांमुळे लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. आंबेगाव तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेल्या कारवाईनंतर हे प्रकरणही चर्चेत आले असून, नागरिकांनी अहिल्यानगरातील दूषित अन्नविक्रीवरही तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत