मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण साक्षी ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा अजितदादा पवार यांची वर्णी लागली असून, शनिवारी सायंकाळी राजभवनात अतिशय साध्या आणि गंभीर वातावरणात त्यांचा शपथविधी पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमावर दुःखाचे सावट होते.
सुनेत्रा पवार यांनी अत्यंत गांभीर्याने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत. शपथविधीपूर्वी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.
कुटुंबावर कोसळलेले दुःख बाजूला सारत, पक्ष आणि राज्याच्या भविष्यासाठी धीरोदात्तपणे पुढे येत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. राज्याच्या इतिहासात त्यांचे नाव पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंदले गेले आहे.
शपथविधीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी
“अजितदादा अमर रहे”, “एकच वादा अजितदादा”
अशा घोषणा दिल्या. या घोषणांनी राजभवनातील दरबार हॉल दुमदुमून गेला.
शपथविधीनंतर थेट बारामतीकडे रवाना; तोपर्यंत मंत्रालयात जाणार नाहीत
शपथविधी कार्यक्रम संपताच सुनेत्रा पवार तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. त्यांच्या सोबत पुत्र जय पवार होते. अजित पवार यांचा दशक्रिया विधी पूर्ण होईपर्यंत त्या बारामतीतच थांबणार असून, दुखवटा संपेपर्यंत मंत्रालयात न जाण्याचा निर्णय त्यांनी कुटुंबासह घेतला आहे. खातेवाटप जाहीर झाले तरीही त्या तात्काळ प्रशासकीय कामकाजात सहभागी होणार नाहीत.
राष्ट्रवादीची एक बैठक, दोन महत्त्वाचे ठराव
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवन, मुंबई येथे दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी दोन वाजता पार पडली. ही बैठक खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले
सुनेत्रा अजितदादा पवार यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड
विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंबंधी सर्व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देणे
हे ठराव छगन भुजबळ यांनी मांडले असून, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ आणि संजय बनसोड यांनी त्यांना अनुमोदन दिले.