बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

महाराष्ट्र

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार 60 रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कारवाईला वेग आला असून, दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, ट्रस्टचे तत्कालीन सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त आणि मध्यस्थांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, संबंधित आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असता ते नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. अटकेच्या भीतीने आरोपी फरार झाल्याची चर्चा असून, या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

घोटाळ्यातील प्रमुख आरोप

20 लाख रुपयांची जमीन दुरुस्ती दस्ताद्वारे तब्बल 3 कोटी रुपयांना दाखवून निधीचा अपहार.

देवस्थानाच्या 23 जमिनींच्या मालकी आणि कागदपत्रांमध्ये गंभीर विसंगती.

दानपेटी, पशुधन विक्री व इतर माध्यमांतून मिळालेल्या कोट्यवधींच्या देणगीचा अधिकृत हिशोब नसल्याचा आरोप.

भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची नोंद, वजन व विक्रीची माहिती गायब.

उत्पन्न आणि खर्चात फेरफार करण्यासाठी दोन स्वतंत्र नोंदवह्यांचा वापर.

बनावट कागदपत्रे तयार करून पुराव्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप.

गुन्हे दाखल होऊन 15 दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आरोपींना नेमके कुणाचे संरक्षण आहे?”, “पोलिसांवर कोणाचा दबाव आहे?” आणि “या प्रकरणातील खरा सूत्रधार कोण?” असे प्रश्न उपस्थित होत असून, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा विशेष तपास पथक (SIT) करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत