यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

महाराष्ट्र

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचा लिलाव होत असल्याची चर्चा अत्यंत दुर्दैवी असून, हा संपूर्ण सहकार चळवळीवर कलंक असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

कोरेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांच्या ठरावांचा लिलाव होत असल्याच्या चर्चेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला महाराष्ट्रातील आदर्श सहकारी बँक म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अनेक सहकार नेत्यांनी योगदान दिले. पूर्वी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बँकेच्या हितासाठी निवडणुका होत असत. मात्र, आता प्रत्येक संस्थेवर सत्ता मिळवण्याच्या राजकारणामुळे निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

कराड तालुक्यातील कोडोली येथील एका सोसायटीत ठरावासाठी लिलाव पद्धत अवलंबल्याची चर्चा होत असल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, गावाने विचारपूर्वक ठराव करण्याऐवजी त्याचे आर्थिक व्यवहार होणे ही गंभीर बाब आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेऐवजी सत्ता, पैसा, दडपशाही आणि हुकूमशाहीच्या बळावर राजकारण सुरू असून, ठरावांचा बाजार हा लोकशाहीचा पराभव असल्याची टीका त्यांनी केली.

जावली तालुक्यातील आखाडे गावात ठराव प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केले. बाहेरून काही संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. कोणत्याही सभासदावर दबाव टाकून किंवा भीतीचे वातावरण निर्माण करून ठराव करून घेणे लोकशाहीला घातक असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत