मोदींची सुप्रिया सुळेंसह ८ खासदारांची बैठक; पवार गटाच्या NDA प्रवेशाची कुजबुज; बैठकीत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र

नवी दिल्ली : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली खासदारांच्या शिष्टमंडळाने मोदींची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या खासदारांसोबत तब्बल २५ ते ३० मिनिटे चर्चा केली. या बैठकीत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसह खासदारांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, निधी आणि नागरिकांच्या समस्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा

राज्यातील पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतमालाला योग्य आणि हमीभाव मिळावा, अशी मागणी खासदारांनी केली. मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

फुले दाम्पत्यांसह चार महापुरुषांना ‘भारतरत्न’ची मागणी

या बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील चार महान व्यक्तिमत्त्वांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याची मागणी. राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे याबाबत निवेदनही सादर केले.या मागणीत महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावांचा समावेश आहे.

सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या महापुरुषांचे मोठे योगदान असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देण्यात यावा, अशी आग्रही मागणी खासदारांनी केली.

मोदींकडून मागण्या गांभीर्याने ऐकून घेण्याचे आश्वासन

बैठकीदरम्यान खासदारांनी मांडलेल्या मतदारसंघनिहाय प्रश्नांसह महाराष्ट्रातील विविध मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्याचे सांगण्यात आले. संबंधित मागण्यांवर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली ही भेट केवळ विकासकामांसाठीची भेट होती की, त्यामागे भविष्यातील राजकीय समीकरणांचीही काही पार्श्वभूमी आहे? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. U

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत