मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि भांडूपमधील मनसेच्या बंडखोर नेत्या अनिशा माजगावकर यांची आज महत्त्वपूर्ण भेट झाली. या भेटीत राज ठाकरे यांनी माजगावकर यांना पुन्हा पक्षात सक्रिय होण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात भांडूपसह मुंबईतील मनसेच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत भांडूपच्या वॉर्ड क्रमांक ११४ वरून अनिशा माजगावकर यांना निवडणूक लढवायची होती. मात्र, जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेल्याने मनसेने युतीधर्म पाळत ही जागा ठाकरे गटाला सोडली. त्यानंतर माजगावकर यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात बंडखोरी करत ठाकरे गटाच्या उमेदवार राजोल पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
आजच्या भेटीत राज ठाकरे यांनी भांडूपच्या जागेबाबत झालेल्या घडामोडींवर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. “भांडूपच्या जागेबाबत जे झालं, ते चुकीचं झालं. मीही त्या जागेसाठी तेव्हा आग्रही होतो,” असे राज ठाकरे यांनी माजगावकर यांच्याशी बोलताना सांगितल्याचे समजते. तसेच, “भांडूपची ती जागा आपल्याला मिळाली असती तर आपण तिथेही जिंकलो असतो,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.
यावर्षी जानेवारीत झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. जागावाटपात मनसेच्या वाट्याला ५२ जागा आल्या होत्या. याच प्रक्रियेदरम्यान भांडूपच्या वॉर्ड क्रमांक ११४ वरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद निर्माण झाले होते.
मनसेने ही जागा ठाकरे गटाला दिल्यानंतर राजोल पाटील यांना उमेदवारी मिळाली. मात्र, अनिशा माजगावकर यांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. या निवडणुकीत राजोल पाटील यांनी विजय मिळवला.
राजोल पाटील या खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आहेत. संजय दीना पाटील यांनी नंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राजोल पाटील यांच्या पक्षीय भूमिकेबाबत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, राजोल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेत आपण ठाकरे गटासोबतच असल्याचे स्पष्ट केले होते.
आता अनिशा माजगावकर पुन्हा मनसेमध्ये सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाल्याने भांडूपच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांच्या सूचनेनंतर मनसे भांडूपमध्ये पुन्हा संघटनात्मक ताकद उभी करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आगामी काळात राजोल पाटील आणि संजय दीना पाटील यांच्यासमोरील राजकीय आव्हानही वाढू शकते.