मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आठ खासदारांनी आज, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात ही भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत १५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा केली.
या भेटीनंतर खासदार अमोल कोल्हे यांनी बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली. भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार यांच्या उत्साहाचे आणि सक्रियतेचे कौतुक केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.
‘शरद पवारांच्या एनर्जीचा आदर्श घेतला पाहिजे’
शरद पवार हे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असतानाही राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची ऊर्जा आणि जिद्द प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याची माहिती कोल्हे यांनी दिली. शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा आशयाचे कौतुक मोदी यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीत राष्ट्रवादीच्या खासदारांनी आपल्या मतदारसंघातील विविध प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडले. प्रलंबित विकासकामे, मतदारसंघातील समस्या तसेच नागरिकांशी संबंधित विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या खासदारांची ही भेट केवळ राजकीय चर्चेपुरती मर्यादित राहिली नाही, तर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यासाठीही महत्त्वाची ठरली. बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यातील परस्पर आदराची झलकही या भेटीत पाहायला मिळाल्याचे स्पष्ट केले.