चाकणसाठी स्वतंत्र औद्योगिक नगरी; फडणवीसांची मोठी घोषणा

महाराष्ट्र

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण आणि लगतच्या परिसरातील वाढते औद्योगिकीकरण तसेच पायाभूत सुविधांवरील वाढता ताण लक्षात घेऊन या भागासाठी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ‘औद्योगिक नगरी’ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

चाकण परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने उद्योगांनी स्थलांतराचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे चाकणमधील उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

चाकण परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अशा विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित आहे. त्यामुळे रस्ते आणि वाहतुकीचे विभागनिहाय नियोजन करण्याऐवजी संपूर्ण परिसराचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडीचा प्रश्न, वाहतूक व्यवस्थापन, एकात्मिक रस्ता व वाहतूक नियोजन तसेच उद्योगांच्या प्रलंबित प्रशासकीय तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीला चाकण परिसरातील उद्योगांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासह आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चाकणपुरतेच हे प्रयत्न मर्यादित राहणार नसून पुण्यातील इतर औद्योगिक वसाहतींमध्येही ही समिती काम करणार आहे. पुढील टप्प्यात ‘इंडस्ट्रियल टाऊनशिप’ कायद्यांतर्गत अशा ठिकाणी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत