बीडमध्ये धक्कादायक प्रकार; विलास घुले यांच्या पत्नीने वृत्तवाहिनीसमोरच केले विषप्राशन

महाराष्ट्र

बीड : केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याची चौकशी करून त्याला अटक करावी, या मागणीसाठी घुले कुटुंबीय मागील दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी बीडमध्ये दाखल झालेल्या असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्कादायक प्रकार घडला. विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असतानाच त्यांनी विषप्राशन केले.

प्रकृती गंभीर झाल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुषमा घुले यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर घुले कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी उपोषणाची जागा सोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू केले.

विलास घुले यांची काही महिन्यांपूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, सौरभ सोनवणे यांचीही चौकशी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी घुले कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घ्यावी, अशी त्यांची भूमिका आहे.या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत