शिंदेसेनेला भाजपाची धास्ती? राऊतांचा फडणवीसांना इशारा; मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाचा गौप्यस्फोट ते सपकाळांची टीका

राजकीय

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेदांपासून विरोधकांच्या सरकारवरील टीकेपर्यंत विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार संजय गायकवाड यांच्या भाजपाबाबतच्या वक्तव्यांची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत केलेल्या दाव्यामुळेही राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपाला सूचक इशारा

शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला उद्देशून केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली होती. ‘मी भोळा राहिलो असतो तर भाजपावाल्यांनी मला खाऊन टाकले असते,’ असे विधान त्यांनी केले होते.

यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला. गुलाबराव पाटील यांचे विधान शिवसैनिकांना लागू होते. त्यामुळे कुणीही भोळे राहू नये. राजकारणात आजचा मित्र कधी उद्याचा शत्रू होईल, हे सांगता येत नाही, असे गायकवाड यांनी म्हटले.या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे शिंदेसेनेमध्ये भाजपाबाबत अस्वस्थता आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘फडणवीसांनी स्वतःवर संकट ओढवून घेऊ नये’; राऊतांचा इशारा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जनतेच्या न्यायालयात लागला आहे. हाच निकाल सर्वोच्च न्यायालयातही लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी, ‘ही काय धमकी आहे का? तुम्ही काय न्यायमूर्तींना भेटून आला आहात का? अशा धमक्या देऊ नका. तुम्ही त्यात पडू नका आणि तुटेपर्यंत ताणू नका,’ असे म्हटले.फडणवीसांनी विनाकारण स्वतःवर संकट ओढवून घेऊ नये. इतर गद्दारांच्या टोळ्यांचे काय करायचे ते आम्ही पाहू; मात्र तुम्ही त्यात पडू नका, असा सूचक इशाराही राऊत यांनी दिला.

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते आणि त्यासाठी काही अटीही त्यांनी ठेवल्या होत्या, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला.

आपण मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या, असा दावा चव्हाण यांनी केला. मुंडे यांनी मंत्रीपदाची अट ठेवली होती. मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विरोधी पक्षातील खासदाराला पक्षात घेऊन मंत्री करण्यास विरोध केल्याने मुंडेंचा काँग्रेस प्रवेश झाला नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.चव्हाण यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या राजकीय इतिहासातील एका महत्त्वाच्या घडामोडीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

फोडाफोडीच्या राजकारणावर सुप्रिया सुळेंचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवरून सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली.

एकसंध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ते संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही, असे सुळे यांनी म्हटले. निवडणूक आयोगासह विविध यंत्रणांचा ज्या पद्धतीने वापर झाला, तो लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिवसेना काल, आज आणि उद्याही उद्धव ठाकरे यांचीच राहील, असा दावा करत सुळे यांनी पक्षफुटीच्या प्रकरणातील पुरावे न्यायालयात सादर केल्याचे सांगितले.

फडणवीसांवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे फडणवीसांचे दावे हास्यास्पद आहेत. ते जे बोलतात, त्याच्या नेमके उलट करतात, असा आरोप सपकाळ यांनी केला.

फडणवीस स्वतःची प्रतिमा ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ आणि ‘इन्फ्रा मॅन’ अशी तयार करतात; मात्र प्रत्यक्षात ते महाराष्ट्रासाठी ‘डिझास्टर मॅन’ ठरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यातून उद्योग बाहेर जात असून मोठ्या प्रमाणावर मध्यम व लघु उद्योग बंद पडल्याचा दावा सपकाळ यांनी केला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, सत्ताधारी महायुतीतील नेत्यांची वक्तव्ये आणि विरोधकांकडून होत असलेली टीका पाहता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी आरोप-प्रत्यारोप रंगण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या नेत्यांच्या वक्तव्यांवर भाजप काय भूमिका घेणार, तसेच राऊतांच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत