“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, फडणवीसांसमोर कशाला झुकतील?”
पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या पुण्यात उद्या, २२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
“भाजपाला राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा धसका घेतला असून कार्यक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कितीही अडवणूक आणि अपप्रचार केला तरी पुण्यात हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार,” असा दावा कन्हैयाकुमार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.
भाजपाच्या शैक्षणिक धोरणावर टीका करताना कन्हैयाकुमार म्हणाले की, “मनुवादी विचारसरणीमुळे देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद होत आहे. शिक्षण महागडे झाले असून ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. सरकारी शाळा बंद होता कामा नयेत. महागडे शिक्षण घेऊनही विद्यार्थ्यांना रोजगाराची शाश्वती नाही. परीक्षांचे पेपर फुटणे, शिक्षणातील गैरप्रकार यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.”
‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. “कोटापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमात अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रत्येक कार्यक्रम यशस्वी झाला. पुण्यातही अडथळे आणले जात असले तरी कार्यक्रम थांबणार नाही,” असे कन्हैयाकुमार यांनी सांगितले.
सोशल मीडियावर कार्यक्रमाबाबत अपप्रचार केला जात असल्याचा आरोप करत ते म्हणाले, “या कार्यक्रमासाठी पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही. विद्यार्थी स्वतःहून येत आहेत. कितीही अडथळे आणले तरी राहुल गांधी पुण्यात येणार आणि कार्यक्रमही होणारच.”“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील?” असा सवालही कन्हैयाकुमार यांनी उपस्थित केला.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.