बीडच्या राष्ट्रीय खो-खो खेळाडूची पुण्यात आत्महत्या; पॉक्सो गुन्ह्यानंतर होता फरार

क्राईम महाराष्ट्र

बीड : बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता. अटकेची भीती आणि जामिनाबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

तुकाराम करांडे याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दोन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी बीडमधील बार्शी रोड परिसरात अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर तो बाहेर आला होता.

दरम्यान, बीड तालुक्यातील एका गावातील शाळेत क्रीडा प्रशिक्षण देत असताना तुकारामची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली होती. संबंधित मुलगी शिक्षणासाठी बीड शहरात आल्यानंतर तुकाराम आणि त्याच्या मित्रांनी तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. मित्रांच्या मदतीने कॅफेमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप मुलीने तक्रारीत केला आहे.

या तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तुकाराम बीडमधून फरार होऊन पुण्यात आला होता.

या प्रकरणात तुकाराम आणि त्याच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. १८ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी २१ ऑगस्ट रोजी होणार होती.

दरम्यान, अवैध पिस्तूल प्रकरण आणि त्यानंतर पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यामुळे जामीन मिळण्याबाबत निर्माण झालेल्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पुणे आणि बीड पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत