कारेगाव भिशी प्रकरण; ‘व्याजाला सोकले अन् मुद्दलाला मुकले’ अशी गुंतवणुकदारांची अवस्था 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील बहुचर्चित ‘कारेश्वर भिशी’ प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला वेग आला आहे. दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून ३९ गुंतवणूकदारांकडून तब्बल २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिली.

या प्रकरणात सुलभा शरद नवले, नितीन शरद नवले, सुहास शरद नवले, अश्विनी नितीन नवले आणि प्रतिक्षा सुहास नवले, सर्व (रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे) यांच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापैकी अटक केलेल्या आरोपींना पोलिस तपासासाठी यापुर्वी न्यायालयाने सुरवातीला अटक आरोपींना २४ ऑगस्टपर्यंत सहा दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर पुन्हा चार दिवस न्यायालयाने २८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी वाढवली. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची खरी कसोटी लागणार आहे.

दामदुप्पट परताव्याचे आमिष अन् कोट्यवधींची उलाढाल…

फिर्यादी बारकू चंदर सोनवणे यांच्या तक्रारीनुसार, ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’च्या नावाखाली भिशी चालविण्यात येत होती. भिशी नोंदणीकृत असल्याचे भासवून तसेच लिलाव भिशीत पैसे गुंतवल्यास एका वर्षात मूळ रकमेच्या दामदुप्पट रक्कम मिळेल, असे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचा आरोप आहे.

सन २०२० ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३९ गुंतवणूकदारांकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपये जमा केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

स्वतःची गुंतवणूक तब्बल ७५ लाखांची…

या प्रकरणातील फिर्यादी सोनवणे यांनी स्वतःसह कुटुंबीयांच्या माध्यमातून कारेश्वर भिशीत ७५ लाख ४० हजार रुपये गुंतवल्याचा दावा केला आहे. त्यापैकी ४२ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन, तर ३२ लाख ८० हजार रुपये रोख स्वरूपात दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याशिवाय भिशीत पैसे भरण्यासाठी सांगण्यात आलेल्या इतर व्यक्तींच्या बँक खात्यांवरही रक्कम वळती करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणात केवळ भिशीचे खाते नव्हे, तर संबंधित व्यक्तींची बँक खाती, ऑनलाइन व्यवहार आणि रोख पैशांच्या हालचाली तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

कुठेही नोंदणी नसताना कोट्यवधींचे व्यवहार कसे…?

या प्रकरणातील सर्वात गंभीर मुद्द्यांपैकी एक म्हणजे ‘कारेश्वर बी.सी. मंडळ’ कोणत्याही सरकारी कार्यालयात, बँकेत किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत नसतानाही नोंदणीकृत असल्याचे भासवून व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर हा आरोप तपासात सिद्ध झाला, तर नागरिकांचा विश्वास संपादन करुन एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार कसे करण्यात आले, याचा तपास पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

भिशी बंद पडली अन् गुंतवणूकदारांची धावपळ…

नोव्हेंबर २०२४ पासून भिशी बंद पडल्याचे सांगण्यात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपापली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. मात्र वारंवार मागणी करुनही पैसे परत मिळाले नसल्याचा आरोप आहे.

दामदुप्पट परताव्याच्या आशेने पैसे गुंतविणारे आता मुद्दलाच्या रकमेसाठीच धावाधाव करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘व्याजाला सोकले अन् मुद्दलाला मुकले’ अशी या गुंतवणूकदारांची अवस्था झाल्याची चर्चा कारेगावसह परिसरात सुरु आहे.

२० कोटींचा पैसा नेमका गेला कुठे…?

आता पोलिसांच्या तपासातील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ३९ गुंतवणूकदारांकडून जमा झालेला २० कोटी ३४ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा पैसा नेमका कुठे गेला…? कोणत्या बँक खात्यांमध्ये किती रक्कम जमा झाली…? कोणाच्या खात्यावर किती पैसे वळते झाले…? किती रक्कम रोख स्वरूपात स्वीकारण्यात आली…? भिशीच्या हिशोबाच्या नोंदी कुठे आहेत..? गुंतवणूकदारांच्या पैशातून कोणाला किती रक्कम देण्यात आली…? तसेच या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का…? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

पोलीस कोठडी वाढल्याने तपासाला दिशा मिळणार…?

यातील आरोपींना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याने तपास यंत्रणेला आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी वेळ मिळणार आहे. बँक स्टेटमेंट, ऑनलाइन व्यवहार, रोख रकमेचे व्यवहार, भिशीच्या नोंदी आणि संबंधित व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी केल्यास या प्रकरणाचे खरे स्वरूप अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

आता प्रश्न फक्त २० कोटींचा नाही; या पैशांचा हिशोब कुठे आहे, कोणाकडे आहे आणि या कथित आर्थिक व्यवहारामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा आहे. ३९ गुंतवणूकदारांच्या पैशांचा एक-एक रुपया शोधून सत्य बाहेर आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

(क्रमश:)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत