शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शाळेसह गावाचा नावलौकिक उंचावला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. शिक्षक दत्तात्रय वडघुले आणि मधुकर साकोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये श्लोक किशोर गायकवाड (२५८ गुण), आयुष राजाराम चव्हाण (२५४ गुण), स्वराली हनुमंत वडघुले (२५२ गुण), तन्वी लक्ष्मण रणसिंग (२४८ गुण), संस्कार प्रकाश धोत्रे (२४४ गुण) आणि यशराज संदीप काळे (२४४ गुण) यांचा समावेश आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक दत्तात्रय वडघुले आणि मधुकर साकोरे यांचा पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
दरम्यान, ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगीनेही या गुणवंतांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देत ग्रामपंचायतीने शिक्षण क्षेत्रातील या यशाचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने गौरव केला.
या गौरव सोहळ्यास शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे, केंद्रप्रमुख सुनील भोरकडे व रामदास विश्वास, मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामनराव गव्हाणे, सरपंच डॉ. सचिन चव्हाण, पोलीस पाटील किरण काळे, दादासाहेब रणसिंग, विक्रमदादा चव्हाण, म्हसोबा महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अर्जुन चव्हाण सर, कांतीलाल मामा टाकळकर, भिवाजी चौधरी, विजयबापू करपे, काकासाहेब ढेरंगे, वैभव चव्हाण, समीर चव्हाण, अमोल चव्हाण, संतोष नागवडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शिष्यवृत्ती परीक्षेतील या घवघवीत यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत निमगाव म्हाळुंगी, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामस्थ तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या जोरावर जिल्हा परिषद शाळांमधूनही उत्कृष्ट गुणवत्ता निर्माण होत असल्याचे या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.