गडचिरोलीच्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्ती लुटण्याचा डाव; वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

महाराष्ट्र

गडचिरोली: उद्योगांच्या माध्यमातून गडचिरोलीचा कायापालट करण्याच्या घोषणा सत्ताधाऱ्यांकडून केल्या जात असल्या, तरी जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, रस्ते, सिंचन आणि रोजगाराच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. उद्योगांचे गाजर दाखवून नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोलीची लूट करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अपुरी असून डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. चामोर्शी येथे नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ही आरोग्य व्यवस्थेच्या अपयशाचे गंभीर उदाहरण आहे. मुख्यमंत्री स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची अशी अवस्था कायम राहणे दुर्दैवी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खराब आहे, शाळा बंद पडत आहेत आणि सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. अशा परिस्थितीत उद्योगांच्या घोषणा कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “आधी रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उभ्या करा. त्यानंतर उद्योग आणण्याचे नियोजन करा,” अशी मागणी त्यांनी केली.

आदिवासी आश्रमशाळांमध्ये मागील दोन वर्षांत सर्पदंशामुळे २८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करत वडेट्टीवार यांनी या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल केला. आदिवासी विभागाच्या मंजूर निधीपैकी मागील वर्षी केवळ २९ टक्के निधी खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

“एकीकडे आश्रमशाळा आणि सिंचनासाठी निधी नाही, तर दुसरीकडे अदानी समूहाला हजारो हेक्टर जमीन देण्याची सरकारला घाई का?” असा प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

गडचिरोलीच्या विकासाला आपला विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली जिल्ह्याची नैसर्गिक संपत्ती लुटणे आणि स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणणे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. गडचिरोलीला विकास, स्थानिकांना रोजगार आणि जिल्ह्याच्या संपत्तीवर स्थानिकांचा हक्क हवा; सत्ताधाऱ्यांची लूट नको, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे आमदार रामदास मसराम, ॲड. राम मेश्राम, अजय कंकड्यालवार, मनोहर पोरेटी, पंकज गुडेवार, सतीश विधाते, गावडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत