आई-बहीण, पत्नीबाबत अश्लील शिवीगाळ अन् जीभ कापण्याची धमकी

महाराष्ट्र

आमदार संजय गायकवाडांविरोधात कोथरूड पोलिसांकडे तक्रार

पुणे: संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशांत आंबी नामक व्यक्तीशी फोनवर बोलताना आमदार गायकवाड यांनी आई, बहीण आणि पत्नीबाबत अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप करत एका महिलेने कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार सोनाली त्रिंबक कांबळे यांनी केली आहे.

कांबळे यांनी ५ सप्टेंबर रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्या दहीहंडीचा कार्यक्रम आणि सजावट पाहण्यासाठी कोथरूड परिसरात आल्या असताना सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर, एक ऑडिओ प्रसारित होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकासंदर्भातील कथित वादातून आमदार संजय गायकवाड हे प्रशांत आंबी यांच्याशी फोनवर बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाषणात गायकवाड यांनी अत्यंत गलिच्छ आणि अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, आंबी यांच्या घरात घुसून मारहाण करण्यासह जीभ कापण्याची आणि ठार करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे.

‘महाराजांचे नाव घेऊन अश्लील भाषा वापरणे आक्षेपार्ह’

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला जाणीवपूर्वक आदर असून, महाराजांचे नाव घेत अशा प्रकारची खालच्या पातळीची भाषा वापरणे अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे कांबळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या आमदाराकडून अशा प्रकारची भाषा वापरली गेली असल्यास या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, व्हायरल ऑडिओची सत्यता, तो नेमका कधी आणि कोणामध्ये झालेल्या संभाषणाचा आहे तसेच ऑडिओमधील आवाज आमदार संजय गायकवाड यांचाच आहे का, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही. या सर्व बाबींचा तपास झाल्यानंतरच सत्य समोर येणार आहे. तक्रारीवर कोथरूड पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत