लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन; अब्दुल समद यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा
मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आंदोलनाची भूमिका घेतली असून, ‘लोकशाही बचाव, संविधान बचाव’चा नारा देत मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ‘SIR रद्द करा’ आणि ‘मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा’, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनाला वेगळे वळण मिळाले.
आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे एक शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर करणार होते. मात्र, निवेदन देण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याचा आरोप युवक काँग्रेसकडून करण्यात आला.
पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलन सुरू ठेवणार!
पोलिसांनी युवक काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असला, तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अब्दुल समद यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘वोटचोरी’विरोधातील आंदोलनाचा आवाज कोणीही दडपू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.
“सरकार पोलिसांना पुढे करून विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, मतदारांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी सुरू केलेले ‘वोटचोरी’विरोधातील आंदोलन यापुढेही सुरूच राहील,” असा इशारा अब्दुल समद यांनी दिला.
SIR प्रक्रियेच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.