राज्यात गुंडाराज, अमित शाह अन् फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत; हर्षवर्धन सपकाळ

महाराष्ट्र

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून माफिया आणि गुंडांकडून खुलेआम धमक्या दिल्या जात आहेत. बॉलिवूड कलाकारांच्या घरापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. गुजरातच्या तुरुंगातून माफिया राज चालवले जात असल्याचा गंभीर आरोप करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार निशाणा साधला. गुंडांच्या खुल्या धमक्या सुरू असताना अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. ते म्हणाले की, बॉलिवूडमधील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांना धमक्या दिल्या जात असून त्यांच्यावर हल्लेही होत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्यानंतर आता अमिताभ बच्चन यांनाही लक्ष्य केले जात असल्याचा दावा त्यांनी केला. हल्ल्याच्या भीतीमुळे अमिताभ बच्चन यांना बुलेटप्रूफ काचेमागून चाहत्यांना भेटावे लागत आहे, ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

नोटाबंदीमुळे दहशतवाद संपेल, असा दावा सरकारने केला होता. मात्र, प्रत्यक्षात दहशतवाद आणि गुंडगिरी अधिक जोमाने वाढली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात अभिनेते खुलेआम फिरत होते; मात्र आज भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बॉलिवूडमधील सध्याची परिस्थिती पाहता, ‘कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन’ असे म्हणण्याची वेळ आल्याची टीका सपकाळ यांनी केली.

डिलिमिटेशन विधेयकाला इंडिया आघाडीचा विरोध कायम

डिलिमिटेशन विधेयकामुळे खासदारांची संख्या ५५० वरून ८५० पर्यंत वाढणार असल्याचा मुद्दा उपस्थित करत सपकाळ यांनी या विधेयकाला विरोध दर्शविला. लोकप्रतिनिधींची संख्या वाढवायची असेल तर केवळ खासदारांचीच संख्या का वाढवली जात आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्याही वाढवली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

काँग्रेससह इंडिया आघाडीचा या विधेयकाला पहिल्यापासून विरोध आहे. इंडिया आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असली, तरी आघाडीचा विरोध कायम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) देखील या विधेयकासंदर्भात आवश्यक पावले उचलेल, असे ते म्हणाले.

राहुल गांधींमुळे नव्हे, एपस्टिन फाईलमुळे भारताची बदनामी!

राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करतात, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांच्यामुळे भारताची जगात बदनामी होत नाही, तर मोदी सरकारमधील मंत्र्याचे नाव एपस्टिन फाईलमध्ये आल्याने देशाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विरोधी पक्षांचे नेते आणि न्यायाधीश यांच्या फोनमध्ये पेगॅसेस स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे आरोप, संसदेत विरोधी पक्षनेते बोलत असताना माईक बंद करण्याचे प्रकार, महागाई, बेरोजगारी आणि हंगर इंडेक्समधील भारताची स्थिती यामुळे देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होत असल्याचे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी सुमारे ४५०० किलोमीटरची पदयात्रा काढून हमाल, मेकॅनिक, शेतकरी, विद्यार्थी आणि विविध पीडित घटकांशी संवाद साधला आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सुरक्षा बाजूला ठेवून जनतेत मिसळण्याची गरज असल्याचा टोला सपकाळ यांनी लगावला.

रोहित पठारे हत्या प्रकरणी फडणवीसांवर निशाणा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे रोहित पठारे या तरुणाची झालेली हत्या संतापजनक असल्याचे सपकाळ म्हणाले. या प्रकरणातील पोलीस तपासावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असून अटक केलेल्या आरोपींची ओळख परेड कुटुंबीयांसमोर करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. उलट रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांनाही धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात अशा प्रकारच्या हत्या आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असताना देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

‘शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू’ अभियानाला सुरुवात

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र NSUI च्या ‘शिक्षण वाचवू, पर्यावरण वाचवू, लोकशाही वाचवू’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. झाडे जगवा, पर्यावरण वाचवा तसेच शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचाराविरोधात NSUI राज्यभर आंदोलन करणार आहे.

विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान या अभियानांतर्गत भव्य मोर्चाही काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार वजाहत मिर्झा, राहुल बोंद्रे आणि NSUI चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत