अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खंबीरपणे विकासाचा वारसा पुढे नेणार; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

अमित शाह यांच्या हस्ते अजितदादांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण; पुणे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराला अजितदादांचे नाव

पुणे: “मी एका संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. दादांची अपूर्ण स्वप्ने, त्यांचे विचार आणि विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी मी खंबीरपणे उभी आहे. आज उभारण्यात आलेला पुतळा आणि नामकरण करण्यात आलेले प्रवेशद्वार हे केवळ स्मारक न राहता जनसेवेची प्रेरणा देणारे केंद्र ठरावे,” अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली.

लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पुणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराचे नामकरण केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आजचा क्षण माझ्यासाठी अत्यंत भावनिक आहे. दादांची सहचारिणी म्हणून त्यांचा कामाचा वेग, विकासाची दूरदृष्टी आणि सामान्य माणसाविषयीची तळमळ मी जवळून अनुभवली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेत आज त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही भावना शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल दादांच्या मनात विशेष आदर होता. महाराष्ट्र, शेती, सहकार आणि विकासाच्या विविध प्रश्नांसाठी दादा त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असत. आज अमित शाह यांनी दादांच्या कार्याचा गौरव करताना पिंपरी-चिंचवडच्या स्वच्छता सर्वेक्षणातील यशासाठी अजितदादांनी घेतलेल्या २९ बैठकांचा विशेष उल्लेख केला. अजितदादांचा राजकीय प्रवास युवा नेत्यांसाठी एका विद्यापीठाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.

दादांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले. शिक्षण, आरोग्य, ग्रामीण पायाभूत सुविधा आणि ग्रामस्वच्छता या क्षेत्रांत जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ३०३ मॉडेल स्कूल, १०८ मॉडेल आरोग्य केंद्रांचे उद्दिष्ट, विद्यार्थ्यांचे यश आणि विविध अभियानांतील जिल्ह्याची कामगिरी ही दादांच्या विकासदृष्टीची फलश्रुती आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक मिळाला असला, तरी दादांचे स्वप्न प्रथम क्रमांकाचे होते. हे स्वप्न पूर्ण करण्याचा माझा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी जिल्हा परिषदेत आयोजित अजितदादांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही मान्यवरांसह भेट दिली. या प्रदर्शनातून दादांच्या आयुष्यातील विविध प्रसंग, राजकीय प्रवास, जनसेवेचा ध्यास आणि विकासकामांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असला, तरी त्यांनी सुरू केलेला विकासाचा प्रवास थांबणार नाही. पुणे जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने करण्याचा आणि सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देत त्यांच्या विकासकार्याचा गौरव केला. कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सहकारी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत