जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात; पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमसाठी प्रथमच सीईटी
मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा होणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम या तीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेतली जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दोन वेळा सीईटी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या यंदा तीनवरून ११ करण्यात आली आहे. जानेवारी २०२७ मध्ये परीक्षांना सुरुवात होणार असून, १० जून २०२७ पर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी पार पडणार आहेत.
२०२६ मध्ये झालेल्या २० सीईटी परीक्षांसाठी तब्बल १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळावी, यासाठी शासनाने यंदा दोन परीक्षा देण्याचा पर्याय विस्तारला आहे.
११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी
राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्यासाठी मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेतल्या जात आहेत. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद पाहता यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा होणार आहेत.
विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असेल, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण मिळतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
तीन अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी
शासनाच्या निर्देशानुसार यंदा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी आयोजित केली जाणार आहे. यापैकी पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांच्या परीक्षा एमबीए सीईटीसोबतच घेतल्या जाणार असून, त्यासाठी दोन संधी उपलब्ध असतील.
दोन वेळा होणाऱ्या सीईटीचे संभाव्य वेळापत्रक
एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी २०२७; दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७.
पाच वर्षीय एलएलबी : पहिली परीक्षा २८ ते २९ मार्च; दुसरी परीक्षा २४ मे २०२७.
पीसीबी समूह : पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल; दुसरी परीक्षा ६ ते ८ मे २०२७.
पीसीएम समूह : पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल; दुसरी परीक्षा १० ते १५ मे २०२७.
बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल; दुसरी परीक्षा २७ ते २८ मे २०२७.
अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखा
एमएचएमसीटी – २४ मार्च, एमसीए – २७ मार्च, एएसी (कला शिक्षण) – ११ एप्रिल, बी.डिझाईन – १८ एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी – ४ व ५ मे, डीपीएन/पीएचएन – १८ मे, नर्सिंग – १८ व १९ मे, जीएनएम नर्सिंग – २१ व २२ मे, एमपीएड – ५ जून, एमएड – ६ जून, तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ दरम्यान होणार आहेत.
एकात्मिक बीएड-एमएड सीईटी यंदा नाही
दरम्यान, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम केवळ एका संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे ही परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच एमपीएड, एमएड आणि बीएडच्या परीक्षा जून महिन्यात घेण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून यंदा या परीक्षा जूनमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत.
सीईटी कक्षाने जाहीर केलेले वेळापत्रक संभाव्य असून, परीक्षांच्या अधिकृत तारखा आणि पुढील सूचनांसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.