मराठवाड्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी सपकाळ मैदानात; बूथपासून जिल्हास्तरापर्यंत बांधणीचे निर्देश

महाराष्ट्र

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगावर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल; पात्र मतदारांची नावे वगळू नका, BLA प्रतिनिधींना दिला लढ्याचा संदेश

मुंबई: मराठवाड्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक बांधणीवर विशेष भर दिला आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने आणि समन्वयाने काम करत बूथपासून जिल्हास्तरापर्यंत पक्षसंघटना मजबूत करावी. पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्याबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून संघटना अधिक सक्रिय करावी, असे आवाहन सपकाळ यांनी केले.

मराठवाडा विभागातील लोकसभा मतदारसंघ प्रभारी, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघ प्रभारी यांची संघटनात्मक आढावा बैठक बीड येथे पार पडली. काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातील पक्षसंघटनेची सद्यस्थिती, सुरू असलेले उपक्रम आणि आगामी काळातील पक्षविस्ताराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीला सहप्रभारी रेहाना चिस्ती, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार शिवाजी काळगे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस गुरबिंदर बच्छर, आदित्य पाटील आणि बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला धारेवर

दरम्यान, SIR प्रक्रियेच्या अंमलबजावणीदरम्यान मतदारांना आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या प्रतिनिधींना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी झिरपी (ता. अंबड, जि. जालना) येथे हर्षवर्धन सपकाळ आणि डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी काँग्रेसच्या BLA-2 प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी काँग्रेसच्या BLA प्रतिनिधींनी सरकारी BLO यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार मांडली. सत्ताधारी पक्षाचे BLA-1 आणि सरकारी BLO यांच्या संगनमतातून प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे काही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. वारंवार पाठपुरावा करूनही आवश्यक माहिती आणि सहकार्य मिळत नसल्याची व्यथा प्रतिनिधींनी मांडली.

यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, SIR प्रक्रियेच्या नावाखाली एकाही पात्र मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळले जाता कामा नये. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्षता आणि सर्वांना समान सहकार्य मिळणे आवश्यक आहे. मतदारांचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसचे BLA प्रतिनिधी सजगपणे काम करत असून त्यांच्या अडचणी आणि तक्रारींचा गांभीर्याने पाठपुरावा केला जाईल.

‘२०० मतदारसंघांतील मतदानाची आकडेवारी कुठे गायब झाली?’

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरही सपकाळ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, २०० मतदारसंघांतील संध्याकाळी पाच वाजल्यानंतरच्या मतदानाची माहितीच निवडणूक आयोगाकडे उपलब्ध नाही. यामध्ये महाराष्ट्रातील ११४ मतदारसंघांचा समावेश आहे. आकडेवारी गायब, पारदर्शकता गायब, उत्तरदायित्व गायब आणि तरीही निवडणूक आयोगाची मुजोरी कायम आहे, अशी टीका त्यांनी केली.

सत्तेच्या दबावाखाली लोकशाहीच्या विश्वासार्हतेशी खेळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कोणी दिला? जनतेच्या मतांचा संपूर्ण हिशेब द्या, मतदानाची सर्व आकडेवारी सार्वजनिक करा आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, शहराध्यक्ष विशाल धानुरे, जिल्हा प्रभारी श्याम उमाळकर, राजेंद्र राख, राजाभाऊ देशमुख, प्रभाकर पवार, तालुकाध्यक्ष श्रीरंग कामठे आणि कल्याण तारडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत