राजस्थानमध्ये भीषण अपघात! धुळ्यातील ९ भाविकांचा मृत्यू; जखमींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदे सरसावले

महाराष्ट्र

मृतदेह महाराष्ट्रात आणण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश; गंभीर जखमीच्या उपचारांबाबत रुग्णालय प्रशासनाशी संवाद

मुंबई : राजस्थानमधील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील ९ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एका प्रवाशाची प्रकृती गंभीर असून, खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन क्रुझर गाडीतून महाराष्ट्रात परतत असताना काळाने या भाविकांवर घाला घातला. या दुर्घटनेमुळे धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राजस्थानमधील कोटा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन निलेश जैन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी जखमींच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली. गंभीर जखमी असलेल्या रुग्णाला पुढील उपचारांसाठी एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता आहे का, अशी विचारणाही त्यांनी डॉक्टरांकडे केली.

मात्र, सध्या संबंधित रुग्णाला एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता नसून रुग्णालयातच त्याच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. यानंतर सर्व जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांचे मृतदेह लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश

या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह गावी पोहोचल्यानंतर धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शोकाकुल कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, तसेच अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली सर्व व्यवस्था व्यवस्थित पार पाडावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.या कठीण प्रसंगी जखमींना तातडीने उपचार आणि मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक सहकार्य मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत