चित्रपटातील गाण्याला दृश्यात्मक रूप देणे हीच नृत्यदिग्दर्शकाची खरी कला; फुलवा खामकर

महाराष्ट्र

‘चित्रपताका–२०२६’मध्ये ‘नृत्याची भाषा’ कार्यशाळेतून सिनेनृत्याचे बारकावे उलगडले

मुंबई : चित्रपटातील गाणे प्रभावीपणे पडद्यावर साकारण्यासाठी केवळ नृत्यकौशल्य पुरेसे नसून संगीत, शब्द, ताल, कलाकारांच्या हालचाली आणि कॅमेऱ्याचा अचूक समन्वय आवश्यक असतो. नृत्यदिग्दर्शकाचे काम कलाकारांना नाच शिकवण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण गाण्याला दृश्यात्मक स्वरूप देण्याचे असते, असे प्रतिपादन प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ‘चित्रपताका–२०२६’ मराठी चित्रपट महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात आयोजित ‘नृत्याची भाषा’ या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सिनेनृत्य आणि नृत्यदिग्दर्शनातील विविध पैलूंची ओळख करून देणाऱ्या या कार्यशाळेला सिनेरसिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी फुलवा खामकर यांनी आपल्या नृत्यदिग्दर्शनाच्या प्रवासातील अनुभव सांगताना ‘नटरंग’सारख्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख केला. नृत्यदिग्दर्शकाने सातत्याने स्वतःचे ज्ञान वाढवणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी वाचनाचे महत्त्वही अधोरेखित केले. विविध विषयांवरील पुस्तके वाचल्याने विचारांची व्याप्ती वाढते आणि सर्जनशीलतेला नवे आयाम मिळतात. त्यामुळे नृत्यदिग्दर्शकांनी केवळ नृत्यापुरते मर्यादित न राहता व्यापक वाचन आणि अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

नृत्यदिग्दर्शन म्हणजे सांघिक कलाविष्कार!

‘फिल्म कोरिओग्राफी’ची संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी चित्रपटातील गाण्याच्या निर्मितीमध्ये नृत्यदिग्दर्शकाची भूमिका किती व्यापक असते, हे उदाहरणांसह सांगितले. गाण्याचे संगीत, शब्द आणि ताल यांचा सखोल अभ्यास करून कलाकारांच्या हालचालींची रचना करावी लागते. त्याचबरोबर कॅमेऱ्याच्या माध्यमातून या हालचाली अधिक प्रभावीपणे कशा टिपल्या जातील, याचाही विचार करावा लागतो. गाण्यातील प्रत्येक घटकाचा समन्वय साधून त्याला पडद्यावर सुसंगत आणि परिणामकारक रूप देणे, हीच नृत्यदिग्दर्शनाची खरी प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नृत्यदिग्दर्शन ही सांघिक प्रक्रिया असून नर्तक, दिग्दर्शक, छायांकनकार आणि वेशभूषाकार यांच्याशी योग्य संवाद व समन्वय राखणे आवश्यक आहे. नृत्यदिग्दर्शकाला कॅमेऱ्याच्या कामकाजाची मूलभूत माहिती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रसंगानुरूप योग्य निर्णय घेण्याची क्षमता हा नृत्यदिग्दर्शकाचा महत्त्वाचा गुण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘वाजले की बारा’मधून नृत्यदिग्दर्शनाचे धडे

कार्यशाळेत फुलवा खामकर यांनी ‘वाजले की बारा’ हे गाणे दाखवून त्यातील सादरीकरण आणि नृत्यदिग्दर्शनाचे बारकावे प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगितले. तसेच ‘पिंजरा’ चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचा संदर्भ देत गाण्यांच्या चित्रीकरणातील शॉट डिव्हिजन आणि पूर्वतयारीचे महत्त्व स्पष्ट केले. नृत्यदिग्दर्शनाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांनी ‘पिंजरा’ चित्रपटातील गाणी आवर्जून पाहावीत, अशी सूचनाही त्यांनी केली.

कार्यशाळेच्या अखेरीस उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी प्रात्यक्षिकांसह उत्तरे दिली. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, महोत्सवाचे संचालक पुरुषोत्तम बेर्डे, महोत्सवाचे क्युरेटर डॉ. संतोष पाठारे यांच्यासह सिनेरसिक आणि नृत्याकलेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत