शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : कोरेगाव भीमा गावातील शांतता सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थ आणि पोलिस प्रशासनाने एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी नागरिकांनीही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून पोलिसांना सहकार्य करावे. मात्र, कायद्याचा भंग करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे.
कोरेगाव भीमा येथे ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वाढते औद्योगिकीकरण कंपन्या व गोदाम व्यवसायातून निर्माण होणारे वाद, कामगारांच्या समस्या, गुन्हेगारीला प्रतिबंध आणि अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक यादव यांनी कोरेगाव भीमा परिसरातील औद्योगिक आणि सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला.
ते म्हणाले, ‘कोरेगाव भीमा हा सधन आणि रोजगाराच्या मोठी संधी उपलब्ध असलेला परिसर आहे. येथे उद्योग-व्यवसाय वाढत असताना परस्परांमध्ये विश्वास सुसंवाद आणि कायद्याचे पालन असणे तितकेच महत्त्वाचे असून कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसाय करणाऱ्यांना पोलिसांचे नेहमीच सहकार्य राहील. परंतु गुन्हेगारी, दादागिरी किंवा गावातील शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जाणार नाही.’
View this post on Instagram
गुन्हेगारांवर कठोर कारवाई सामान्य नागरिकांना न्याय…
सामान्य नागरिकांच्या तक्रारींची पोलिस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जाईल गावातील चांगल्या वातावरणाला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. गुन्हेगारीपासून दूर राहून सामाजिक प्रतिष्ठा जपावी. गोदाम व्यवसायासाठी जागा भाड्याने देताना संबंधित कंपन्या आणि व्यक्तींची विश्वासार्हता तपासावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये काही अडचण निर्माण झाल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही यादव यांनी केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘राज्यात मोक्का आणि एमपीडीएसारख्या कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही गुन्हेगाराचा आणि गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा शेवट चांगला होत नाही. गावातील वादविवाद वाढू नयेत यासाठी प्रत्येकाने संयम आणि समाज संयमाची भूमिका घ्यावी लोकशाहीत मतभेद असू शकतात मात्र मनभेद निर्माण होऊ देऊ नयेत. गाव हे एका कुटुंबाप्रमाणे असून गावपण टिकविण्यासाठी संवाद एकोपा आणि परस्परांना समजून घेणे आवश्यक असून प्रसंगी एकमेकांना माफ करण्याची आणि स्वतःची चूक असल्यास माफी मागण्याची तयारीही ठेवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कामगार नेते अविनाश देवकर यांनी औद्योगिक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या वेतन कपातीचा आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला काही ठिकाणी एचआर विभाग आणि कंत्राटदार यांच्या संगनमतातून कामगारांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अहिल्यानगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी गर्दीच्या वेळी वढू चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्याबाबतही चर्चा झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांनी प्रभावी वाहतूक नियोजनासोबतच ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, नारायणराव फडतरे, राजाराम ढेरंगे, अशोक काका गव्हाणे, माजी सरपंच अनिकेत गव्हाणे, विजयराव गव्हाणे, अशोक काशीद, केशवराव फडतरे, दत्तात्रय ढेरंगे, कांतीलाल फडतरे, नारायण ढेरंगे, बबनराव गव्हाणे, पंडित ढेरंगे, शिवाजीराव ढेरंगे आदी मान्यवर उपस्थित होते. विवेक ढेरंगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर माजी सरपंच विजय गव्हाणे पाटील यांनी आभार मानले.
शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला दहा गुन्ह्यांचा आरोपी! पुण्यातून अटक…
शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…
शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले