शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या गांजाची बाजारभावानुसार अंदाजे किंमत १ कोटी ५२ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली. पोलिसांनी गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनासह दोघांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलीस आणि शिरुर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक करणारे एक वाहन यवतच्या बाजूने शिरुरच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती शिरुर पोलिसांना रात्रीच्या सुमारास मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तातडीने हालचाली सुरु केल्या. निमोणे परिसरासह शिरुर शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास संबंधित वाहन शिरुर-गोलेगाव रस्त्यालगत असलेल्या सुंदर सृष्टी परिसरात आले असता पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पोलिसांना चकवा देत वाहन वेगाने पुढे नेले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरु केला. हा पाठलाग सुरु असताना वाहन स्टेट बँक कॉलनी परिसरात शिरले. अखेर पोलिसांनी वाहनाला घेराव घालून ते पकडण्यात यश मिळवले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये व्यवस्थित पॅकिंग केलेला मोठ्या प्रमाणावरील गांजा आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार हा गांजा २५० किलोहून अधिक असून त्याची किंमत सुमारे १ कोटी ५२ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. सध्या गांजाची मोजणी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.
या कारवाईत दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून गांजाचा साठा नेमका कोठून आणला होता…? तो कोणाला पुरवठा केला जाणार होता आणि या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. शिरुर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अमली पदार्थ तस्करीच्या रॅकेटवर मोठा घाव बसला असून या प्रकरणाच्या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.