क्रीडा संकुलांचा अखर्चित निधी परत घेणार! गरजेनुसार इतर संकुलांना पुनर्वितरण; सुनेत्रा पवारांचे कडक निर्देश

महाराष्ट्र

मुंबई : राज्यातील क्रीडा संकुलांसाठी मंजूर करण्यात आलेला मात्र दीर्घकाळ खर्चाविना पडून असलेला निधी आता संबंधित समित्यांकडून परत घेण्यात येणार आहे. हा निधी क्रीडा सुविधांची नितांत आवश्यकता असलेल्या इतर क्रीडा संकुलांना पुनर्वितरित करण्यासह शिल्लक निधीचा तातडीने विनियोग करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. तसेच, शासकीय अनुदानाच्या निर्धारित मर्यादेबाहेरील क्रीडा संकुलांचे प्रस्ताव मंजुरीसाठी तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

राज्यातील विविध विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांना प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक गुरुवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत क्रीडा संकुलांच्या विकासासाठी उपलब्ध निधीचा योग्य आणि प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.

राज्यातील अनेक क्रीडा संकुलांकडे निधी उपलब्ध असतानाही तो दीर्घकाळ खर्च न झाल्याचे लक्षात घेऊन, अशा संकुलांचा अखर्चित निधी परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निधीअभावी क्रीडा सुविधा विकसित करण्यास अडचणी येत असलेल्या संकुलांना हा निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पुनर्वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे उपलब्ध निधीचा अधिक प्रभावी वापर होण्यास मदत होणार आहे.

या बैठकीत राज्यातील विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी शासकीय अनुदानाच्या निर्धारित मर्यादेत बसणाऱ्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

क्रीडा सुविधांच्या विकासात निधीची कमतरता भासू नये, मंजूर निधी विनावापर पडून राहू नये आणि राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने वेगाने कार्यवाही करावी, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा व युवक सेवा आयुक्त दीपक सिंगला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे यांच्यासह वित्त, नियोजन, नगर विकास-२, महसूल आणि क्रीडा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत