elvis-cream

शिरूर! गोरेपणाच्या जाहिराती करून आरोग्याशी खेळ! विषारी क्रीमने मलठणच्या तरुणाला ढकलले मृत्यूच्या दारात…

क्राईम मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे) : चेहरा गोरा करण्याच्या जाहिरातींना भुलून सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणाऱ्या तरुणांसाठी डोळे उघडणारी आणि प्रशासनाला हादरवून सोडणारी घटना मलठण (ता. शिरूर) येथे समोर आली आहे. चेहरा उजळण्याच्या जाहीराती पाहून अपेक्षेने Elvis Gloaming Face Brightening Night Cream या नावाची क्रीम ऑनलाईन मागवून वापरल्याने मच्छिंद्र कदम यांची प्रकृती गंभीर झाल्याचा त्यांचा आरोप आहे. या क्रीममध्ये वापरले जाणारे पाऱ्याचे अंश शरीरात पसरल्याने त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्यांचे प्राण वाचले; मात्र या उपचारांसाठी तब्बल दहा ते बारा लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे कदम यांनी सांगितले.

चेहरा गोरा करण्याच्या नादात लाखोंचा फटका आणि जीव धोक्यात! ही केवळ एका तरुणाची व्यथा नसून बाजारात बिनधास्त विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. चेहऱ्याचा रंग बदलण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार अशा कंपन्यांना कोणी दिला, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सोशल मीडिया, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि विविध जाहिरातींमधून काही दिवसांत चेहरा गोरा करण्याचे दावे केले जातात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी आकर्षक पॅकिंग, मोठमोठे दावे आणि सवलतींचा आधार घेतला जातो. मात्र अशा उत्पादनांमध्ये नेमके कोणते रासायनिक घटक वापरले आहेत? त्यांची तपासणी झाली आहे का? उत्पादन सुरक्षित आहे का? याची खातरजमा कोण करणार?

एखादे उत्पादन वापरून नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असेल, तर संबंधित उत्पादक आणि विक्रेत्यांची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. केवळ जाहिरातींच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून चालणार नाही; उत्पादनांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित क्रीमचे नमुने ताब्यात घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी करावी. त्यामध्ये पारा किंवा अन्य घातक घटक आढळतात का, याची खातरजमा करावी. तसेच उत्पादनाची निर्मिती, विक्री, वितरण, ऑनलाइन विक्री आणि आवश्यक परवानग्यांची सखोल चौकशी करावी.

चौकशीत नियमांचे उल्लंघन किंवा आरोग्यास अपायकारक घटक आढळल्यास संबंधित उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी. गरज पडल्यास संबंधित उत्पादनाची विक्री थांबवून बाजारातून साठा परत मागविण्याची प्रक्रिया राबवावी. केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरून अशा उत्पादनांची तपासणी करण्याची गरज आहे.

तरुणांना कदम यांचा सावधगिरीचा इशारा!
मच्छिंद्र कदम यांनी इतर तरुणांना अशा क्रीमचा वापर करताना अत्यंत सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आकर्षक जाहिराती आणि ऑनलाइन दाव्यांना बळी पडू नका. उत्पादनाची माहिती, घटक आणि सुरक्षितता तपासल्याशिवाय चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक उत्पादन वापरू नका, असे त्यांनी म्हटले आहे.
मणिपाल हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर महेश जाधव यांच्या प्रयत्नांमुळे गंभीर परिस्थितीतून बाहेर पडता आल्याचे सांगत कदम यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात ग्राहक आयोगासह सक्षम यंत्रणांकडे दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एका क्रीममुळे गंभीर आजारी पडून एका कुटुंबावर लाखोंच्या उपचारांचा आर्थिक डोंगर कोसळला. उद्या अशी वेळ दुसऱ्या कोणावर येऊ नये, यासाठी प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. सौंदर्याच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची कसून तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा अशा जाहिरातींच्या मोहात आणखी किती तरुणांचे आरोग्य धोक्यात येणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहील!

शिरूरमध्ये ‘पोलीस’ असल्याचा बनाव रचला, भामट्यांनी सोनं आणि रोख रकमेवर मारला डल्ला…

शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

जांभूळ खाताना या चुका करु नका

अशी घ्या दातांची काळजी

ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत