‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ अभियानातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा जागर; प्लास्टिक कचरा, अतिक्रमण आणि प्रदूषण रोखण्याचे आवाहन
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट हे स्वराज्याच्या दूरदृष्टीचे, पराक्रमाचे आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्याचे प्रतीक आहेत. या ऐतिहासिक गडांचे पावित्र्य, वारसा आणि पर्यावरण जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. शिवरायांच्या दूरदृष्टीतून आजच्या तरुणांनी प्रेरणा घेऊन गडसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
संविधान दिनानिमित्त रायगडावरील हिरकणीवाडी येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) वतीने आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. तसेच अभियानांतर्गत स्वच्छता दूतांशी संवाद साधला आणि पाचाड-महाड मार्गावरील वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली.
शिवरायांनी किल्ल्यांवर पाणी व्यवस्थापन, धान्य साठवण, बाजारपेठा आणि संरक्षण व्यवस्थेचे उत्तम नियोजन केले होते. त्यांच्या राज्यकारभारात सामान्य जनतेचे हित केंद्रस्थानी होते. शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान ही न्याय, समानता आणि लोकशाहीची मूल्ये पुढे नेणारी प्रेरणास्थाने आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.
संविधानामुळे सामान्य कुटुंबातील व्यक्तीलाही देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये संविधान दिनाला राष्ट्रीय स्तरावर विशेष महत्त्व दिले. मात्र, संविधान धोक्यात असल्याचा अपप्रचार करून विरोधक जनतेमध्ये चुकीचे कथानक पसरवत आहेत, असा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील तब्बल २१८ गडांना भेट देणाऱ्या आठ वर्षीय मुलीने गडसंवर्धनाबाबत केलेल्या सूचनांचे त्यांनी विशेष कौतुक केले. गडांवरील प्लास्टिक कचरा, अतिक्रमणे आणि प्रदूषण रोखण्यासाठी ठोस प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गडकोटांचे संवर्धन, वृक्षारोपण, सौरऊर्जेचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि स्वच्छता यासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामीण भागातील प्लास्टिक कचरा, नदी प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना सहकार्य करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि अनुदानाच्या माध्यमातून मदत करण्यासाठीही प्रयत्न व्हावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतकरी, सामान्य नागरिक आणि संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना’ या भूमिकेतून मदतीचे कार्य सुरू आहे. गडसंवर्धनाचे अभियान केवळ सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता त्याचे व्यापक लोकचळवळीत रूपांतर झाले पाहिजे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाधिकारी किसन जावळे, युवासेना कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, स्वच्छता दूत आणि शिवभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.